Thu, Jul 16, 2020 23:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : लिफ्ट देण्याचा बहाण्याने तरुणीवर बलात्कार

मुंबई : लिफ्ट देण्याचा बहाण्याने तरुणीवर बलात्कार

Published On: Feb 24 2018 1:36AM | Last Updated: Feb 24 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

दहिसर रेल्वे स्थानकापर्यंत लिफ्ट देण्याचा बहाणा करुन एका 31 वर्षीय ज्युनिअर आर्टिस्ट तरुणीला एका निर्जन इमारतीमध्ये आणून जिवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार झाल्याची घटना दहिसर परिसरात घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच एक महिन्यानंतर पळून गेलेल्या   प्रदीप प्रेमनारायण तिवारी ऊर्फ चिंटू (27) या रेकॉर्डवरील आरोपीस गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. 

आरोपीविरोधात नऊहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित तरुणी ही ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करीत असून सध्या ती तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहते. तिने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. 12 जानेवारीला ती कामानिमित्त वसई येथे गेली होती. रात्री उशिरा ती वसई येथून दहिसर येथे आली. बराच वेळ रिक्षाची वाट पाहूनही तिला रिक्षा मिळाली नाही. याच दरम्यान तेथून बाईकने जाणार्‍या चिंटूने तिला दहिसर रेल्वे स्थानकापर्यंत लिफ्ट देण्याचा बहाणा करुन तिला त्याच्या बाईकवर बसवले. 

काही अंतर गेल्यानंतर चिंटूने तिला एका निर्जनस्थळी असलेल्या इमारतीमध्ये आणले. तिथे तिला बेदम मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. स्वतःची सुटका केल्यानंतर ती घरी आली आणि घडलेला प्रकार  आईला सांगितला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच दहिसर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते. 

युनिट बाराचे विक्रम कदम, राजेश कदम, गायकवाड, भेकरे, तावडे, यांनी दहिसर येथील अशोकवन रिक्षा स्टॅण्ड परिसरातून प्रदीप तिवारी याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात चोरी, जबरी चोरी, विनयभंग, बलात्कार आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पीडित तरुणीने आरोपीला ओळखल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.