Tue, Nov 13, 2018 22:22



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्य सरकार 36 हजार पदांची भरती करणार; जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

राज्य सरकार 36 हजार पदांची भरती करणार; जाणून घ्या संपूर्ण अपडेट!

Published On: Jul 05 2018 1:55AM | Last Updated: Jul 05 2018 1:55AM



मुंबई : वृत्तसंस्था

राज्य शासनाच्या विविध विभागांतील, तसेच निमशासकीय कार्यालयांतील रिक्‍त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या महिनाअखेर राज्यातील सर्वच विभागांतील रिक्‍त पदांची जाहिरात निघणार आहे. यानुसार 36,000 पदांची भरती करण्यात येणार आहे. महिन्याभरात नोकरभरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे.

मार्च-एप्रिलमध्ये पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या सेवेतील एकूण रिक्‍त जागांपैकी 72 हजार पदे भरण्याची घोषणा केली होती. 

त्यानुसार पहिल्या टप्प्यात 36 हजार पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 17 जुलैला राज्यातील सर्व विभागांना रिक्‍त पदांची माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानंतर 31 जुलैला पदांची जाहिरात निघणार आहे. ऑगस्टमध्ये जिल्हा निवड समित्यांच्या समन्वयातून नियोजन करून एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार्‍या 36 हजार जागा खालीलप्रमाणे

ग्रामविकास विभाग                   11 हजार 5 पदे
सार्वजनिक आरोग्य विभाग         10 हजार 568 पदे
गृह विभाग                              7 हजार 111 पदे
कृषी विभाग                            2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग                    1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग        837 पदे
जलसंपदा विभाग                     827 पदे
जलसंधारण विभाग                  423 पदे
मत्स्य व्यवसाय विकास विभाग   90 पदे
नगरविकास विभाग                  1 हजार 664 पदे