Sun, Jul 12, 2020 21:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भीमा कोरेगाव’ची न्यायालयीन चौकशी

‘भीमा कोरेगाव’ची न्यायालयीन चौकशी

Published On: Jan 03 2018 1:29AM | Last Updated: Jan 03 2018 1:29AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथे सोमवारी झालेल्या दगडफेक व जाळपोळीची विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून तशी विनंती उच्च न्यायालयाला करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. त्यांनी कधीच जातीयतेला खतपाणी घातले नाही. सोमवारी पेरणे फाटा, भीमा कोरेगाव येथे झालेली दगडफेकीची घटना ही दुर्दैवी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. हिंसाचारात मृत झालेल्या व्यक्‍तीच्या कुटुंबाला 10 लाखांची तातडीची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोमवारी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी सुमारे तीन लाख लोक आले होते. काही सामाजिक संघटनेने विविध इशारे दिल्याने पोलिसांच्या सहा कंपन्या नेमून संपूर्ण पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. दंगल घडावी यासाठी काही जणांकडून प्रयत्न होत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे प्रयत्न हाणून पाडण्यात आले.

सोमवारी रात्रीच सर्व नागरिकांना पोलिसांनी वाहनाने सुखरूप घरी पोहोचविले आहे. काही ठिकाणी गाड्या जाळण्याचे व दगडफेकीचे प्रकार घडले. मात्र, पोलिसांनी सर्व स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. या घटनेत सामील असणार्‍यांवर जाती-धर्माचा व विचारांचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. घटनेच्या ठिकाणी एका युवकाचा मृतदेह सापडला असून ही हत्या समजून राज्य सरकार सीआयडीमार्फत चौकशी करणार असल्याचे सांगत त्यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले.

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांना मानणार्‍यांनी अशा घटना होणार नाहीत, यासाठी प्रयत्न करावेत. जनतेने अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता पाळावी. शिवाय जनतेने व राजकीय पक्षांनी समाजात जातीय तेढ निर्माण होईल असे वक्‍तव्य करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

समाजमाध्यमावर विश्‍वास ठेवू नका

मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या घटनेवर संयम दाखविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. समाज माध्यमातून (सोशल मीडिया) काही जण आक्षेपार्ह मजकूर टाकून जातीय तेढ निर्माण करीत आहेत. अशा अफवांवरही जनतेने विश्‍वास ठेवू नये. जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजमाध्यमांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

मुंबई, ठाण्यात तणाव

भीमा-कोरेगाव येथील दंगलीचे तीव्र पडसाद मुंबई, ठाण्यात उमटले असून चेंबूर-गोवंडी स्थानक दरम्यान आंदोलनकर्त्यांनी रेल रोको केल्याने मंगळवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल तीन तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती. तब्बल 50 लोकल रद्द करण्यात आल्याचा जबरदस्त फटका रेल्वे प्रवाशांना बसला. तर ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील काही दुकाने बंद करण्यात आल्यानंतर ठाणे रेल्वे स्थानक व परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. सोशल मीडियावरील अफवांमुळे प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

चेंबूरपाठोपाठ मुलुंडमध्ये रिक्षा रोको करण्यात आला. शिवाय पूर्वद्रुतगती महामार्गावर सात तासांहून अधिक काळ रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. सायनमध्येही या घटनेचे पडसाद उमटल्याने पूर्व उपनगरांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप झाला. 

मुंबईतील मुलुंड, चेंबूर, भांडूप, विक्रोळीतील रमाबाई आंबेडकरनगर, कुर्ला येथील नेहरु नगर या भागांमध्ये सकाळपासून दुकाने बंद ठेवण्यात आली. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर आंदोलक रस्त्यावर उतरले. त्यांनी महामार्गावरील वाहतूक रोखून ठेवली होती. त्यामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये सकाळपासूनच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. याठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली.

वेळीच याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.  टिळकनगर पोलीस स्टेशनअंतर्गत चेंबूरच्या पीएल लोखंडे मार्गावर जवळपास 100 ते 200 कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मंगळवारी सकाळी 11. 45 वाजता काही आंदोलकांनी चेंबूर स्टेशनमध्ये घुसून घोषणाबाजी केली. त्यानंतर काही तरुणांनी रेल्वे रुळावर ठाण मांडून घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अप आणि डाऊन दिशेच्या लोकल ठप्प झाल्या. ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झाले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केले. त्यामुळे दुपारी 4.30 वाजल्यापासून हार्बर रेल्चेवी वाहतुक सेवा सुरळीत सुरू झाली.

चेंबूरमध्ये रेल रोको केल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्याने चेंबूरच्या अनेक भागात रास्ता रोको करण्यात आला. चेंबूर नाका येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको करीत चेंबूर नाका येथे कडकडीत बंद पाळला. यावेळी बेस्ट बसेसनाही टार्गेट करण्यात आल्याचे समजते. अमर महल जंक्शन येथेही रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देत अनेक वाहनांचे नूकसान केले. 

चेंबूरमधील या आंदोलनाचे लोण गोवंडी, मानखुर्द, मुलूंड, विक्रोळी आणि सायनपर्यंत पोहचलं. या भागात अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. आंदोलनामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून घराकडे जाणारा चाकरमानी वाहतुकीच्या जाळ्यात अडकला होता. शिवाय शाळा बसेस, रुग्णवाहिका सुद्धा आंदोलकांच्या गोंधळामुळे रहदारीत अडकून पडल्या होत्या.

मानखुर्द महामार्गावर ही रस्ता रोको करण्यात आला. मुलुंड आणि ठाणे परिसरात ही जमावाने रस्ता रोको केल्याने  वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पूर्व उपनगर महामार्ग ही काही वेळा साठी बंद ठेवण्यात आला होता. घाटकोपर आणि मुलुंड पूर्व भागात ही रस्ता रोको करण्यात आल्याने काही काळ वाहतूक थंडावली आहे. 

सायन-पनवेल महामार्ग रोखला

दुपारनंतर या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले. आंदोलकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन करून हा मार्ग रोखून धरला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईहून पनवेल आणि पनवेलहून मुंबईकडे जाणार्‍या वाहनांचा मोठा खोळंबा झाला. शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर अजूनही ठाण मांडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. कांजूरमार्ग, वडाळा, सायन कोळीवाडा आणि भांडूप आदी भागातही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने तणाव निर्माण झाला.