Mon, Jul 15, 2019 23:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जॉन्सन अँड जॉन्सनला 4.7 अब्ज डॉलर्सचा दंड

जॉन्सन अँड जॉन्सनला 4.7 अब्ज डॉलर्सचा दंड

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:17AMमुंबई : वृत्तसंस्था

जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने 22 तक्रारदार महिलांना 4.69 अब्ज डॉलर्स इतकी विक्रमी भरपाई द्यावी, असा आदेश अमेरिकेतील मिसूरी येथील न्यायालयाने दिला आहे. या कंपनीच्या बेबी पावडरसह इतर पावडर उत्पादनांत अ‍ॅस्बेस्टॉसचा वापर केला जात असून, त्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग जडल्याचा आरोप या महिलांनी केला होता. जॉन्सन अँड जॉन्सन विरोधात देण्यात आलेला हा सर्वात मोठा भरपाई आदेश आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. 

कंपनीविरोधात 9 हजार खटले प्रलंबित आहेत. मात्र आपल्या पावडर उत्पादनांत अ‍ॅस्बेस्टॉसचा वापर करण्यात आल्याचा तसेच त्यामुळे कर्करोग होत असल्याचा जॉन्सन अँड जॉन्सनने इन्कार केला आहे. आमची पावडर उत्पादने सुरक्षित असल्याचे काही दशकांच्या अभ्यासाअंती सिद्ध झाले असून, यापूर्वीचे अनेक निकाल अपिलात आमच्या बाजूने लागले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. 

सेंट लुईस येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी हा निकाल दिला. निकालात नमूद करण्यात आलेल्या रकमेत 550 दशलक्ष डॉलर्स भरपाई रक्‍कम म्हणून आणि 4.14 अब्ज डॉलर्स दंड म्हणून भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.न्यायालयाच्या ऑनलाईन ब्रॉडकास्टनेच ही माहिती दिली आहे. हा निकाल मूलत: अनुचित असून, त्याविरोधात वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार असल्याचे जॉन्सन अँड जॉन्सनने म्हटले आहे. न्यायालयाने भरपाईचा आदेश देताचा कंपनीचे समभाग 1 टक्क्याने घसरले. मात्र नंतर त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली. दोन्ही बाजूंच्या एक डझनहून अधिक तज्ज्ञांनी पाच आठवडे बाजू मांडल्यानंतर  हा निकाल देण्यात आला. दहा वर्षांहून अधिक काळ जॉन्सन अँड जॉन्सनची उत्पादने वापरल्यामुळे आपल्याला कर्करोग जडल्याचा दावा तक्रारदार महिला आणि त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. आपल्या उत्पादनांत अ‍ॅस्बेस्टॉसचा अंश असल्याची माहिती कंपनीला 1970 सालापासून होती, मात्र कंपनीने त्यासंदर्भातील कोणताही इशारा ग्राहकांना दिला नाही, असाही आरोप त्यांनी केला होता. 

तक्रारदार 22 महिलांपैकी 17 महिला मिसूरी बाहेरच्या आहेत. हा प्रांत वादींसाठी पूरक मानला जातो. या निकालानंतर कंपनीने आपली उत्पादने बाजारपेठेतून मागे घ्यावीत किंवा उत्पादनांवर गंभीर इशारा लिहावा, असे आवाहन तक्रारदार महिलांच्या वकिलांनी केला आहे.