Sun, May 26, 2019 21:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात होणार सेवेसाठी नोकरभरती

प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात होणार सेवेसाठी नोकरभरती

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 1:03AMमुंबई : प्रतिनिधी

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासामध्ये  लवकरच विविध सेवांसाठी नोकरभरती होणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने  133 अतिरिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

सिद्धिविनायक मंदिरात गेले 15 ते 16 वर्षे कंत्राटी पद्धतीने कामगार तुटपुंज्या पगारावर काम करत होते. त्यांना कायम स्वरूपी करावे यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रयत्नाला यश आले आणि अतिरिक्त पदे  निर्माण करण्यास यश मिळाले, त्यामुळे गेली अनेक वर्षे अस्थायी स्वरूपात काम करणार्‍या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी मिळेल याचे खूप समाधान आहे अशी प्रतिक्रिया श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.

सिद्धिविनायक मंदिर न्यासासाठी ऑगस्ट 2009 पासून 158 पदावर कामगार कर्मचारी हे सेवेसाठी कार्यरत आहेत .गेल्या काही वर्षांत भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच आस्थापनावरील कामकाजात वाढ झाल्याने सेवेसाठी अतिरिक्त कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याचे न्यासाचे कार्यकारी अधिकारी यांनी विधी आणि न्याय विभागाला पत्राद्वारे कळविले होते . त्यानुसार सहायक पर्यवेक्षक 1, भांडारपाल 1, वायरमन 3, पुजारी 13, सफाई कामगार 7, महिला कामगार 8, सर्वसामान्य कामगार 54, पहारेकरी 46 अशी 133 नवीन पदे भरली जाणार आहेत.

यातील भांडारपाल आणि वायरमन ही पदे रीतसर जाहिरात देऊन सरळ भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. तर सफाई कामगार, महिला कामगार, सामान्य कामगार, पहारेकरी हे पदे भरताना जे याआधी कंत्राटी पद्धतीने काम करत होते त्याना भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे. न्यासाकडून करोडो रुपयांचा निधी सरकारला दिला जातो, त्यामुळे येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या वेतनाचा भार हा सरकारवर पडणार नाही. न्यासाच्या वतीने वेतनासाठी स्वतंत्र निधी उभा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती न्यासाकडून देण्यात आली.