Thu, Jun 27, 2019 00:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानी साखरेच्या गोदामावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल (Video)

पाकिस्तानी साखरेच्या गोदामावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल (Video)

Published On: May 14 2018 3:04PM | Last Updated: May 14 2018 3:00PM ठाणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दहिसर मोरी येथील गोदामावर हल्लाबोल करून पाकिस्तानातून आलेली दोन हजार मॅट्रीक टन साखर नष्ट केली. दरम्यान, पाकिस्तानने दिलेल्या आमच्या जखमांवर या सरकारने मिठ नव्हे तर पाकिस्तानी साखर चोळली आहे.  पाकिस्तानी साखरेचा साठा केलेले गोदाम सरकारने तत्काळ सील करावे, अन्यथा हे गोदाम जाळले जाईल, असा इशारा आमदार आव्हाड यांनी दिला. पाकिस्तानातील साखर आयात करुन मोदी सरकारने आमच्या शेतकर्‍यांना मारण्याचा डाव आखलाय, असा आरोपही आमदार आव्हाड यांनी यावेळी केला. 

डिसेंबर 2017 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामधील ऊस उत्पादक तसेच साखर कारखाने संकटात आहेत. असे असताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात करीत असल्याची माहिती आव्हाड यांनी  सभागृहाला दिली होती. आता हीच साखर बाजारात आली आहे.  ही साखर दहिसर मोरी येथील एका गोदामात दडवली असल्याची माहिती आव्हाड यांना मिळाली. त्यांनी शहराध्यक्ष आनंद परांजपे, नगरसेवक शानू पठाण, सुहास देसाई आदीं सह सदर गोदामात हल्लाबोल केला. या गोदामातील सर्व साखरेच्या गो फोडून साखर  जमिनीवर ओतली तसेच त्यावर पाणी ओतून ही साखर नष्ट केली.  

 यावेळी आ. आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार जनतेशी दगाबाजी  केली आहे.  निवडणुकीच्या काळात पाकविरोधात भाषणबाजी करून हे सरकार सत्तेवर आले आहे. आमचा एक जवान मारला तर त्यांचे दहा मारू , असे म्हणणारे मोदी आज पाकिस्तानी साखर सुकमा एक्सपोर्ट या कंपनीच्या माध्यमातून भारतात आणून आमच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांनाच मारत आहेत. आज भारताची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली आहे. येथील शेतकरी आत्महत्या करीत आहे. या शेतकर्‍यांनी पिकवलेल्या ऊसाला हमीभाव देण्याऐवजी या सरकारकडून पाकिस्तानी साखर आयात करुन पाकिस्तानची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  पाकिस्तान हे आमचे शत्रू राष्ट्र आहे.  या राष्ट्राची साखर भारतात आणून आमच्याच शेतकर्‍यांना मारण्याचा डाव आखला असेल तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 दरम्यान,  देशात मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन झाले असतानाही पाकिस्तानी साखर मुंबईच्या बाजारात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका बाजूला साखरेच्या मागणीत आलेली घट आणि दुसरीकडे शत्रू राष्ट्रातून साखर आयात करण्यात आल्याने सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र, हि साखर आयातच कशी झाली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या गोडावूनमध्ये असलेली साखर ही पाकिस्तानमधील प्रसिद्ध ‘चिस्तीयन’ व ‘लालूवल्ली सिंध’ या ब्रँण्डची साखर आहे.