Wed, Sep 26, 2018 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईकरांना यंदाही ‘जेली फिश’ अ‍ॅलर्ट

मुंबईकरांना यंदाही ‘जेली फिश’ अ‍ॅलर्ट

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईच्या समुद्र किनार्‍यावर तुम्ही जाण्याचा विचारात असाल तर ते तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. कारणही तसेच आहे, मागील काही दिवसांपासुन मुंबईतील गिरगाव आणि जुहू किनार्‍यावर ‘ब्ल्यू बॉटल’ जेलिफिश आढळुन आले आहेत. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने एखाद्याला डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून काही वेळात गाठ येते आणि असह्य वेदना होतात.

तीन वेगवेगळ्या प्रकारचे जेलिफिश समुद्र किनार्‍यावर आढळतात. त्यापैकी पावसाळ्याआधी ब्ल्यु बटन, पावसाळ्यात ब्ल्यु बॅाटल आणि पावसाळ्या नंतर ब्ल्यु बॅाक्स जेलिफिश आढळतात. ब्ल्यु बॅाटल जेलिफिश हे वजनाने हलके असल्यामुळे समुद्राच्या लाटांसोबत ते समुद्र किनार्‍यावर येत असतात. हे जेलिफिश दिसायला जरी आकर्षक असले तरी, विषारी आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत गणेशविसर्जनावेळी गणेश भक्तांना जेलिफिशने दंश केला होता.

‘ब्लू बॉटल’ जेलीफिशला दोन इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे शरीर आणि सात इंच लांबीचे दोरीसारखे पाय असल्याची माहिती ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’चे प्रदीप पाताडे यांनी दिली. किनार्‍यावर वाहून आल्यानंतर या जेलीफिशच्या दोरीसारख्या पायांमध्ये काही प्रमाणात विष असल्याने नागरिकांना अनवाणी किनार्‍यावर फिरू नये, असेही त्यांनी सांगितले.