Wed, Jul 17, 2019 12:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जावेद अख्‍तरही मशिदीतील भोंग्यांच्या विरोधात

जावेद अख्‍तरही मशिदीतील भोंग्यांच्या विरोधात

Published On: Feb 09 2018 3:09PM | Last Updated: Feb 09 2018 3:09PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशात मशिदीवरील भोंग्यांचा वाद हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी भोंग्यांच्या विरोधी भूमिका घेऊन वर्ष झाले आहे. तर आता गीतकार जावेद अख्‍तर यांनीही याप्रकरणावर आपले मत व्यक्‍त केले आहे. त्यांनी सोनू निगमच्या भूमिकेचे समर्थन करताना मशिदीबरोबरच सर्वच निवासी भागातील प्रार्थना स्‍थळांमध्ये भोंगे लावण्यास विरोध दर्शविला आहे. 

जावेद अख्‍तर यांनी याबाबत एक ट्‍विट केले आहे. "मशिदींवर भोंगे नसावेत या सोनू निगमसह इतरांनी व्यक्‍त केलेल्या मताशी सहमत आहे. मशिदीच नव्‍हे तर निवासी परिसरातील कोणत्याही धार्मिक स्‍थळावर भोंगे लावू नयेत," असे मत अख्‍तर यांनी व्यक्‍त केले आहे.

जावेद अख्‍तर यांचं म्‍हणणं त्यांच्या चाहत्यांना पटलेलं दिसत नाही. अनेकांनी त्यांच्या ट्‍विटवर विरोधाचं रिट्‍विट केलं आहे. एका चाहत्याला प्रत्युत्तर करताना जावेद यांनी, "जवळपास ५० वर्षांपूर्वी याच देशात मौलवींनी लाऊडस्‍पीकरला हराम घोषित केले होते. त्यावेळी आपण ते मान्य केले. कधीतरी आपलीही अक्‍कल वापरा, असे म्‍हटले आहे.

दरम्यान, वर्षभरापूर्वी सोनू निगम याने भोंग्यांच्या विरोधात भूमिका व्यक्‍त केली होती. यावर त्याला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याच्या निषेधार्थ सोनूने मुंडनही केले होते. या वादात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.