होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनविरोधात जनमंचचा एल्गार

बुलेट ट्रेनविरोधात जनमंचचा एल्गार

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:14AMमनोर : वार्ताहर

पालघरच्या लायन्स क्लब मैदानावर रविवारी जनमंचच्या वतीने बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारण्यात आला.  या सभेला कष्टकरी संघटना, भूमी अधिकार आंदोलन, महाराष्ट्र राज्य किसान सभा, गुजरात खेडूत समाज, पर्यावरण सुरक्षा समिती आणि शेतकरी संघर्ष समितीसह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेच्या प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोर्‍हे यांनी शिवसेनेची भूमिका मांडताना  बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध आहे आणि भविष्यात राहील, असे स्पष्ट केले.  गेल्या 18 मे रोजी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कृती समितीचे सदस्य रमाकांत पाटील, ब्रायन लोबो आणि उल्का महाजन यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनविरोधी जनतेच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेना बुलेट ट्रेन आणि महामार्गाच्या बाधित शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील, अशी भूमिका मांडली.

बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राची 398 हेक्टर जमीन आणि पालघर जिल्हातील 221.38 हेक्टर जमीन कशी वाया जाणार आहे, याची आकडेवारी आ.डॉ.गोर्‍हे यांनी सादर केली. पालघरमध्ये बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेची स्थिती सुधारा, दिखाव्यासाठी विकास न करता मानवी चेहर्‍याच्या विकासाला महत्त्व द्या, अशी सूचना त्यांनी सरकारला केली. बुलेट ट्रेनमुळे बाधित होणारी जी 70 गावे आहेत. या गावांमध्ये ग्रामसभेचे ठराव संमत झालेत. त्यांनी ते ठराव कृती समितीच्या माध्यमातून आमच्याकडे द्यावे. यासाठी गावोगाव संघर्ष यात्रा करून ते ठराव आम्ही स्वीकारू तसेच  ते ठराव विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि  राज्यसभेच्या सभागृहामध्ये शिवसेनेकडून जनतेची भूमिका ठामपणे मांडू असे आश्‍वासन गोर्‍हे यांनी दिले.