Sat, Jun 06, 2020 23:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेटच्या गोयल दाम्पत्यास  मुंबई विमानतळावरच रोखले

जेटच्या गोयल दाम्पत्यास  मुंबई विमानतळावरच रोखले

Published On: May 26 2019 1:45AM | Last Updated: May 26 2019 1:45AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांना शनिवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर अधिकार्‍यांनी रोखले. नरेश गोयल हे पत्नी अनीता यांच्यासह अमिरातच्या विमानातून लंडनला निघाले होते. मात्र, त्यांच्या विरोधात लूक आऊ ट नोटीस बजावण्यात आलेली असल्याने त्यांचा परदेशात निघून जाण्याचा प्रयत्न यशस्वी होवू शकला नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, अमिरात कंपनीच्या इके 507 विमानातून गोयल दाम्पत्य लंडनला जाण्याच्या बेतात होते. मात्र, त्यांचा हेतू सफल होवू शकला नाही. हे विमान टॅक्सी वेच्या ठिकाणी पोहचले असता अधिकार्‍यांनी गोयल यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजची सेवा 17 एप्रिलपासून पूर्णत: ठप्प झाली आहे. या कंपनीने केलेले आर्थिक व्यवहार सध्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयासह आयकर खात्यातर्फे तपासले जात आहेत. याशिवाय सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील जेट एअरवेजचे इतर आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांशी कसे व्यवहार आहेत, याची चौकशी करत आहे. जेट एअरवेजच्या एकूणच कारभारात गोयल यांची महत्वाची भूमिका राहिल्याने ही कारवाई करण्यात आली.