Thu, Aug 22, 2019 04:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्य सचिवपदी जैन की अजोय मेहता?

मुख्य सचिवपदी जैन की अजोय मेहता?

Published On: Jan 02 2018 2:03AM | Last Updated: Jan 02 2018 1:53AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्य प्रशासनात मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांची नियुक्ती राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून होण्याची शक्यता आहे. राज्याचे भावी मुख्य सचिव म्हणून अर्थखात्याचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यामध्ये खरी चुरस असून मुख्यमंत्री कोणाची निवड करतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्याच्या प्रशासनात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. राज्य सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकीचे पडघम लवकरच वाजण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय गतिमानता वाढविण्यासाठी मुख्य सचिव बदलापासून सुरुवात होणार आहे. मुख्य माहिती आयुक्तपद रिक्त असून या पदासाठी मागविण्यात आलेल्या अर्जामध्ये स्वत: मुख्य सचिवांनी अर्ज केला आहे. त्यांची निवडही निश्‍चित मानली जात आहेे. मात्र, आता त्यांची जागा कोण घेणार याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

सनदी अधिकार्‍यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मेधा गाडगीळ आहेत. मात्र, त्यांची मुख्य सचिवपदी निवड होण्याची शक्यता कमीच आहे. त्यानंतर गृहविभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांचा नंबर लागतो. मात्र, त्यानंतर सेवाज्येष्ठतेत तिसर्‍या क्रमांकावर असलेले वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, ही चर्चा असतानाच मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या नावाने जोर धरला आहे. अजोय मेहता हे बाजी मारणार अशी चर्चा प्रशासनात असताना सेवाज्येष्ठता डावलण्याची शक्यता समोर आल्याने प्रशासनात अस्वस्थता आहे. गेल्या काही वर्षांत सेवाज्येष्ठता पाहूनच मुख्य सचिवांच्या निवडी झाल्या होत्या. मात्र, यावेळी सेवाज्येष्ठतेत पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या व्यक्तींना डावलले जाणार अशी चर्चा असताना अजोय मेहता यांचे नाव अचानक आघाडीवर आले आहे. त्यामुळे प्रशासनातील अस्वस्थतेत भरच पडली आहे.