होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड

जे. पी. नड्डा भाजपचे नवीन अध्यक्ष; बिनविरोध निवड

Last Updated: Jan 20 2020 2:52PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाचे वरिष्ठ नेते जगतप्रकाश उर्फ जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी आदी नेत्यांच्या उपस्थितीत नड्डा यांनी अध्यक्षपदासाठी आपला अर्ज भरला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी नड्डा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार घेण्याआधी नड्डा यांच्याकडे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी होती. लो प्रोफाइल राहूनही पक्षात सर्वात मोठ्या पदावर पोहोचलेल्या नड्डा यांची वाटचाल संघर्षमय राहिलेली आहे. संघटनात्मक क्षमता, लक्ष्य पूर्ण करण्याची धडपड आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याचे वैशिष्ट्य यामुळे पक्षाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे मानले जाते. पंतप्रधान मोदी तसेच अमित शहा यांचे निकटवर्तीय असलेले नड्डा मूळचे हिमाचल प्रदेशचे आहेत.

वयाच्या 16 व्या वर्षी नड्डा जयप्रकाश आंदोलनाशी जोडले गेले. यानंतर ते विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले. 1982 साली साली हिमाचलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत ते अत्यंत लोकप्रिय झाले होते. राज्यात त्यावेळी पहिल्यांदाच अभाविपने निवडणूक जिंकली होती. 1989 साली नड्डा अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बनले. 1991 साली ते भाजप युवा शाखेचे अध्यक्ष बनले. 1993 साली हिमाचल प्रदेशातून ते आमदार म्हणून निवडून आले. 1994 ते 1998 या काळात हिमाचल विधानसभेत नड्डा पक्षाचे नेते होते. 1998 साली ते आरोग्य आणि संसदीय कार्य मंत्री बनले. त्यानंतर 2007 मध्ये राज्य मंत्रिमंडळात ते पर्यावरण मंत्री होते. 2010 साली नड्डा यांच्याकडे भाजपच्या राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 2012 ते पहिल्यांदाच संसदेत पोहोचले. त्यावेळी ते राज्यसभेवर निवडून आले होते.

2014 साली नड्डा यांना भाजपच्या संसदीय समितीचा सचिव म्हणून नेमण्यात आले. 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ते केंद्रात आरोग्य मंत्री बनले. आपल्या राजकीय कारकिर्दीत नड्डा यांनी जम्मू-कश्मीर, पंजाब, हरियाणा, छत्तीसगढ़, तेलंगन, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश सहित इतर अनेक राज्यांचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाचे सदस्य तसेच पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्यपदी ते कार्यरत होते.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी नड्डा यांचे निकटचे संबंध आहेत. मोदी यांच्याकडे हिमाचल प्रदेशचा प्रभार होता, त्यावेळी मोदी आणि नड्डा यांनी एकत्रितपणे त्या राज्यात काम केले होते. मोदी - 2 सरकारच्या कार्यकाळात नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नव्हता. तेव्हापासून त्यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची चर्चा होती. चालू वर्षाच्या अखेरीस बिहारच्या तर पुढील वर्षी प. बंगालच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, या निवडणुकात पक्षाला यश मिळवून देण्याचे खडतर आव्हान नड्डा यांच्यासमोर आहे. पक्षाचे 11 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत असलेल्या नड्डा यांच्याकडे तीन वर्षासाठी पदभार असणार आहे.