Sun, Nov 18, 2018 01:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठवाड्यातील दुष्काळ निवारणात इस्त्रायलची मदत

मराठवाड्यातील दुष्काळ निवारणात इस्त्रायलची मदत

Published On: Jan 19 2018 2:11AM | Last Updated: Jan 19 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

अपुर्‍या पावसामुळे सातत्याने दुष्काळाचा मुकाबला करणार्‍या मराठवाड्यातील दुष्काळ निवारणात आता इस्त्रायलची मदत होणार आहे. इस्त्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एंटरप्रायजेस या शासकीय कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्त्राललचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.  

अत्यंत कमी पर्जन्यमान असून देखील पाणी पुरवठ्याबाबत इस्त्रायलने सक्षम व्यवस्था उभारण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या ज्ञानाचा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. मराठवाड्याची पाणी पुरवठ्याची सक्षम व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्यासाठी इस्त्रायल सरकानेही उत्सुकता दाखवली असून इस्त्रायलच्या नॅशनल वॉटर कंपनीची उपकंपनी असलेल्या मेकोरोट डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड एंटरप्रायजेस या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती. ही कंपनी इस्त्रायल सरकारचा स्वत:चा उपक्रम असून इस्त्रायलमधील 85 टक्के घरगुती पाण्याची व 70 टक्के औद्योगिक पाण्याची मागणी या कंपनीद्वारे पूर्ण केली जाते.

या कंपनीद्वारे मराठवाड्यातील पाणी पुरवठ्यावर उपाययोजना आखण्यासाठी सरासरी पर्जन्यमान, धरणाची साठवण क्षमता, जलसंधारण, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण, नदी खोर्‍यांमध्ये उपलब्ध असणारे पाणी, समुद्राचे पाणी गोडे करणे इत्यादी सर्वंकष प्रयत्न करण्यात येणार आहेत.