Tue, Mar 26, 2019 20:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘इस्माईल युसूफ’च्या निकाल गोंधळाची चौकशी

‘इस्माईल युसूफ’च्या निकाल गोंधळाची चौकशी

Published On: Jun 10 2018 1:48AM | Last Updated: Jun 10 2018 1:20AMमुंबई : प्रतिनिधी

जोगेश्‍वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयातून विद्यान शाखेची परिक्षा देणारे पन्नास टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रात्यक्षिक परिक्षेत देण्यात येणार्‍या गुणांतील गोंधळामुळे एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. बारावी निकाल गोंधळातील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. 

प्रात्यक्षिक परिक्षेचे गुण मिळाले नसल्याने बारावीच्या परिक्षेत यशस्वी होता आले नाही. आम्हाला आमचे गुण द्या, अशी मागणी करत इस्माईल यसूफच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी न्याय मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थी-पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात थेट मंत्रालयात धडक देत शिक्षण मंत्र्यांकडे निकाल गोंधळाबाबत तक्रार करत न्यायाची मागणी केली आहे. 

बारावी विज्ञान शाखेतून परिक्षा देणार्‍या 311 विद्यार्थ्यांपैकी 154 विद्यार्थी नापास झाले आहेत.  प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणच विद्यार्थ्यांना देण्यात आले नाहीत अशी बहुतांश विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यासंदर्भात चौकशी करण्याच्या सूचना शिक्षणमंत्री कार्यालयातून संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आहेत. शिक्षण मंडळाने देखील विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत छाननी सुरू केली आहे. 12 जून रोजी प्रत्यक्ष निकालपत्र हाती येईल तेव्हाच प्रात्यक्षिक परिक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांबाबत स्पष्टता येईल, असे शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.