Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इस्माईल युसूफचे विद्यार्थी मंत्रालयात

इस्माईल युसूफचे विद्यार्थी मंत्रालयात

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 12:58AMमुंबई/जोगेश्‍वरी : प्रतिनिधी

जोगेश्‍वरी येथील इस्माईल युसूफ महाविद्यालयातून विद्यान शाखेची परिक्षा देणारे पन्नास टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. प्रात्यक्षिक परिक्षेचे गुण महाविद्यालय प्रशासनाकडून शिक्षण मंडळाकडे वेळेत पाठविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बारावीच्या निकालात या गुणांचा समावेश न झाल्याने एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थी-पालकांनी न्यायासाठी सोमवारी दुपारी मंत्रालयात धडक दिली.

आम्हाला आमचे गुण मिळवून देण्यासाठी शिक्षण मंडळाकडे प्रयत्न करा, अशी मागणी करत इस्माईल यसूफ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलीस फौज बोलावून विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हुसकावून लावण्यात आले. इस्माईल युसूफ महाविद्यालय हे राज्य शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने संतप्त विद्यार्थी-पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वात थेट मंत्रालयात धडक दिली. शिक्षण मंत्री विनोद तावडे मंत्रालयात नसल्याने विद्यार्थ्यांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. विद्यार्थी-पालकांच्या संतापाची गंभीर दखल घेत शिक्षणमंत्र्यांचे विशेषकार्य अधिकारी श्रीपाद ढेकणे यांनी मंत्रालयात आलेल्या आंदोलकांचे म्हणणे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर सर्वांना बोलावून ऐकून घेतले. या विषयात एक कमिटी स्थापन करून पुढील दोन तीन दिवसात विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्‍वासन देण्यात आले. 

इस्माईल युसूफ महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून परिक्षा देणार्‍या 311 विद्यार्थ्यांपैकी 154 विद्यार्थी नापास झाले आहेत. जवळपास पन्नास टक्के विद्यार्थी नापास होणे, याचा अर्थ परीक्षा पद्धतीत कुठेतरी गडबड दिसून येते. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना देण्यात आले नाहीत, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.