Sun, Jul 21, 2019 01:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिंचन घोटाळा : कारवाईची शक्यता

सिंचन घोटाळा : कारवाईची शक्यता

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:52AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

सिंचन घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 16 ते 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडे अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. पुढे काय होते ते पाहा, असे सूचक वक्‍तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने सिंचन घोटाळ्याप्रकरणी कारवाईला गती येण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांना भाजपच्या महामेळाव्याच्या व्यासपीठावरूनच छगन भुजबळ यांच्या बाजूला आणखी दोन तीन कोठड्या रिकाम्या आहेत, हा दिलेला इशाराही सिंचन घोटाळ्याच्या संभाव्य कारवाईचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर ‘ईडी’ने केलेली कारवाई पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

भाजपच्या महामेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना अमित शहा यांनी राज्य सरकारने सिंचन घोटाळ्याप्रकरणी कारवाई केल्याचे सांगितले. त्यावेळी शेजारी बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत 16 ते 17 गुन्हे दाखल केल्याची माहिती शहा यांना दिली. त्यावर अमित शहा यांनी, सरकारकडे कारवाई करण्यासाठी अजून दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकार आवश्यक ती कारवाई करेल. प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कारवाई करण्याची आमची भूमिका नाही. पुढे काय होते ते पहा, असे अमित शहा यांनी सांगितले.

राज्यातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते. गोशीखुर्द प्रकल्पात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी एकूण 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी दोन प्रकरणांमध्ये आरोपपत्रही दाखल झाले आहे. तर बाळगंगा प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली. या प्रकरणात काही अधिकारी आणि ठेकेदारांना तुरुंगाची हवा खावी लागली होती. या प्रकरणात अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) पाठविण्यात आले आहे. 

Tags : mumbai, mumbai news, Irrigation scam, possibility, action, BJP President Amit Shah,