Wed, Feb 20, 2019 23:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इराणी टोळीची पोलिसांशी धुमश्‍चक्री

इराणी टोळीची पोलिसांशी धुमश्‍चक्री

Published On: Feb 20 2018 1:42AM | Last Updated: Feb 20 2018 1:42AMडोंबिवली : वार्ताहर

नवी मुंबई पोलिसांचे एक पथक ज्यादा कुमक न घेता आंबिवलीच्या इराणी कबिल्यात दोघा गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास गेले खरे. मात्र आरोपींच्या आईने या कबिल्यातील जमाव जमवून पोलिसांना रोखून धरत सदर आरोपीला पळवून लावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नवी मुंबई पोलिसांची पुरती नाचक्की झाली आहे.  

शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. नवी मुंबई पोलिसांचे पथक ज्यादा कुमक न घेता आंबिवलीच्या या इराणी कबिल्यात घुसले. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात पाहिजे असलेले कुख्यात गुन्हेगार जावेद सरवर आणि सरवर अन्नू यांचा माग काढत हे पथक इराणी कबिल्यात धडकले. पोलिसांनी या आरोपींना आत्मसमर्पणाचे आवाहन केले होते. कबिल्यात पोलीस घुसल्याची माहिती वार्‍यासारखी पसरली आणि अख्खा कबिला पोलिसांवर चाल करून आला. याच वेळी जावेदच्या आईने गोंधळ घालत जमाव जमवून पोलिसांसमोर गोंधळ घालत कारवाईत अडथळा निर्माण केला. याच संधीचा फायदा घेत हे दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. अखेर हव्या असलेल्या आरोपींना ताब्यात न घेता पोलिसांना माघारी परतावे लागले. 

नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात जाहिदा, फातिमा, नादरा, सुल्फिकार, अली यांच्यासह पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेले आरोपी जावेद सरवर, सरवर अन्नू आणि जावेद सरवरच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.