Wed, Jun 26, 2019 12:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीच्या तिसर्‍या गुन्ह्यात इक्बालला पुन्हा पोलीस कोठडी

खंडणीच्या तिसर्‍या गुन्ह्यात इक्बालला पुन्हा पोलीस कोठडी

Published On: Feb 28 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 1:36AMठाणे : प्रतिनिधी

गोराई येथील 38 एकरच्या व्यवहारात हस्तक्षेप करत 3 कोटींची खंडणी उकळल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात तिसरा खंडणीचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. यात इक्बालला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. इक्बालविरोधात खंडणीचे तीन गुन्हे दाखल असून तो दुसर्‍या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. पण, तिसर्‍या गुन्ह्याचा तपास करायचा असल्याने त्याच्या पोलीस कोठडीची पोलिसांनी न्यायालयात मागणी केली. 

उत्तर मुंबईत राहणार्‍या तक्रारदाराची गोराई येथे 38 एकर जमीन आहे. या जमीन मालकाने ही जमीन एका व्यक्तीस 2014 मध्ये विक्री केली होती. त्या बदल्यात मूळ जमीन मालकाने खरेदीदाराकडून 2 कोटींची अनामत रक्कमही स्वीकारली होती. मात्र, काही दस्तावेज नसल्याने या जमिनीचा पूर्ण व्यवहार होऊ शकला नाही. त्या जमिनीची नोंदणीही होऊ शकली नाही. दस्तावेजच्या अडचणीमुळे या जमिनीची नोंदणी दोन वर्षे रखडली. याच दरम्यान दोन वर्षांनंतर आपण विक्री केलेल्या जमिनीचे भाव दुप्पट तिपटीने वाढल्याचे मूळ मालकाच्या लक्षात आल्यावर त्याने आपला हा सौदा रद्द करण्याचे ठरवले. मात्र, जमीन घेणार्‍या व्यक्तीने आपण जमिनीचा व्यवहार केला असून त्या बदल्यात 2 कोटींची अमानत रक्कम दिल्याचे सांगत जमीन खरेदीचा हट्ट धरला.

दरम्यान, इक्बालने या जमिनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करत जमीन घेणार्‍या पहिल्या खरेदीदारास धमकावत त्यास जमिनीचा व्यवहार रद्द करण्यास भाग पाडले. जमिनीचा पहिला व्यवहार रद्द करण्याच्या बदल्यात इक्बालने जमीन मालकाकडून 1 कोटींची खंडणी घेतली, तर पहिल्या खरेदीदाराने दिलेली 2 कोटींची अनामत रक्कमही इक्बालने हडपली. दरम्यान, हा सारा व्यवहार 2015 ते 2016 मध्ये झाला तेव्हा काही वेळा जमीन मालक व इक्बाल यांच्यात ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोलणी झाली होती. त्यामुळे तक्रार प्राप्त झाल्यानंतर इक्बालविरोधात ठाणेनगर पोलीसांत खंडणीचा तिसरा गुन्हा दाखल केला.