ठाणे : प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरसह त्याच्या दोघा साथीदारांनी ठाण्यातील एका ज्वेलर्सकडून खंडणीपोटी उकळलेल्या 40 तोळे सोन्यांपैकी 31 तोळे सोने आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केले आहे. यापैकी 20 तोळे सोन्याचा हार इक्बालच्या साथीदारांनी मुलुंडमधील एका बारबालेला भेट दिला होता. त्या बारबालेकडूनही हार जप्त करण्यात आला आहे.
इक्बालविरोधात ठाण्यातील एका ज्वेलर्सकडून खंडणी उकळल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल आहे. या दुसर्या गुन्ह्याच्या तपासासाठी काही दिवसांपूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने इक्बालला पुन्हा ताब्यात घेतले होते. पोलीस कोठडीत केलेल्या चौकशीत इक्बाल व त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार सैय्यद यांनी ज्वेलर्सकडून खंडणीपोटी उकळलेल्या सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने मालाड येथे विकल्याचे सांगितले होते.
पोलिसांनी मालाड येथे विक्री केलेले सोने हस्तगत केले आहे. तर 40 तोळ्यांपैकी 20 तोळे सोने इक्बाल व त्याच्या दोघा साथीदारांनी मुलुंडमधील एका बारबालेला भेट दिल्याचे पोलीस तपासातून समोर आले. पोलीस त्या बारबारलेचा शोध घेत होते. तिचा शोध लागल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडील हार जप्त केला.