होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता, राहुल यांना निमंत्रण

पवारांच्या नेतृत्वामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता, राहुल यांना निमंत्रण

Published On: Nov 30 2017 1:27AM | Last Updated: Nov 30 2017 1:27AM

बुकमार्क करा

मुंबई : खास प्रतिनीधी

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसह अन्य अनेक प्रश्‍न सोडवण्यात राज्य सरकारला अपयश झाल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी येत्या 12 डिसेंबरला नागपूरच्या विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना प्रदेश काँग्रेसकडून निमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असल्याने राहुल गांधी त्यात सहभागीॅ होण्याची शक्यता मात्र कमीच आहे. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या मोर्चात सहभागी होणार आहेत.

राज्य सरकारच्या धोेरणांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षातर्फे नागपुरातील विधान भवनावर हा  मोर्चा काढला जाणार आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी परवाच हॅी घोषणा केली होती. या मोर्चात अधिकाधिक लोक सहभागी व्हावेत यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली असून आपल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनाही निमंत्रण देण्यात आले असल्याचे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने केले आहे. मात्र राहुल गांधी यांच्याकडून अजून काहीही उत्तर देण्यात आलेले नाही. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक प्रचारात व्यस्त असलेले राहुल गांधी या मोर्चात सामील होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते. शिवाय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार असल्याने राहुल हे निमंत्रण स्वीकारण्याची शक्यता कमीच आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद  हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.