Thu, Jun 27, 2019 00:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिद्धीविनायक मंदिरातील मनमानीची चौकशी करा

सिद्धीविनायक मंदिरातील मनमानीची चौकशी करा

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:43AMमुंबई : प्रतिनिधी

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या विश्वस्तांकडून नोटाबंदीच्या काळात मंदिरातून नोटा बदलून घेतल्या गेल्या, महिला भक्तांना हाताने खेचत त्यांना अपशब्द वापरण्यात येतात, देणगीदारांना दिल्या जाणार्‍या गणेश मुर्तींची परस्पर खरेदी केली जाते, वाहन भत्ता मिळत असतांनाही विश्‍वस्तांकडून शासकीय वाहन वापरले जात आहे, देणगीदारांकडून परस्पर 10 लाख रुपये घेतले गेले आणि ते अद्यापही मंदिरात जमा करण्यात आले नाहीत यांसारखे अनेक गंभीर आरोप श्री सिद्धीविनायक मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्यावर आहेत. मात्र, तरीही शासनाने याबाबत काहीच कारवाई केलेली नाही असा आरोप करीत याबाबत कारवाई न झाल्यास जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. विधी आणि न्याय खाते मुख्यमंत्र्यांकडे असूनही याबाबत का कारवाई केली जात नाही, असा सवालही त्यांनी केला. 

मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांच्याविरोधात विश्वस्त मंडळापैकी आदेश बांदेकर व महेश मुदलियार, नरेंद्र राणे तसेच आजी-माजी विश्‍वस्त यांनीही गंभीर तक्रारी केलेल्या आहेत. तसेच, शासन निर्णयानुसार श्री सिद्धीविनायक देवस्थानमध्ये 158 कर्मचार्‍यांच्या नियुक्तीला अनुमती दिली आहे. सद्य:स्थितीत मात्र देवस्थानमध्ये 213 कर्मचारी कार्यरत आहेत. देवस्थानने ओळखपत्र देऊन 441 सेवेकरी नेमले आहेत. देवस्थानने दिलेल्या ओळखपत्रांचा हे सेवेकरी दुरुपयोग करत आहेत. विधी आणि न्याय विभागाकडून केलेल्या अन्वेषणामध्ये समोर आले आहे की, न्यासाच्या कार्यालयामध्ये कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये सर्व कर्मचार्‍यांच्या हजेरीच्या नोंदी पूर्णपणे होत नाहीत, तसेच अधिकारीही शासनाची अनुमती न घेता रजा घेत आहेत असे आरोेपही या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले आहेत. 

अशा प्रकारचे आरोप पत्रकार परीषद घेवून करणे म्हणजे केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी केलेला हा प्रयत्न आहेे. आणि जाणीवपूर्वक बदनामीसाठी केलेला कट आहे. सिद्धिविनायक गणपती मंदीर न्यासावर आल्यानंतर, मंदिर न्यासाशी संबंधित असलेल्या तसेच दैनंदिन कार्यप्रणालीमध्ये सहभागी असणार्‍या काही व्यक्तींकडून सुरु असलेली दुकानदारी बंद झाली. मंदिराचा कारभार नीटनेटका केला, तसेच कारभारात शिस्त आली, कायद्यानुसार व नियमानुसार सर्व काम सुरु आहेत. यामुळेच ही बदनामी हेतूपुरस्सर सुरु करण्यात आली आहे.
- संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिद्धिविनायक मंदीर न्यास समिती, प्रभादेवी, मुंबई.