Wed, Apr 24, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एटीएम क्लोनिंग करून लाखोंची लूट करणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

एटीएम क्लोनिंग करून लाखोंची लूट करणारी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:18AM

बुकमार्क करा
मुलुंड  ः वार्ताहर

मुंबईच्या मुलुंड विभागात तब्बल 99 जणांना एटीएमच्या माध्यमातून लुटणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात मियु अयोनेल(44), मारीयन ग्रामा(44)  दोन रोमानियन नागरिकांसह गणेश शिंदे(36), पुंडलिक हडकर(24)  व दोन भारतीय आरोपींचा समावेश आहे. 

मुलुंड पूर्वच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून 28, 30 नोव्हेंबर, 1, 4, 8, 9 डिसेंबर या तारखांना पैसे काढणार्‍या तब्बल 99 जणांचे एटीएम स्किमरद्वारे क्लोन करून तसेच हिडन कॅमेर्‍याद्वारे त्यांचा पासवर्ड मिळवून या टोळीने त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढले होते. एकूण 32 लाख 29,738 रुपये इतकी मोठी ही रक्कम होती.  याबाबत नवघर पोलिसांनी कलम 419, 420 व आयटी अ‍ॅक्ट 66 क, ड अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. पोलीस उपायुक्त अखिलेश सिंग,  वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी या गुन्ह्याच्या तपासाला तत्काळ सुरुवात केली.

 नवघर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे प्रथम मियु अयोनेल(44) या आरोपीची माहिती मिळवली. त्याच्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणावरून  ठाणे येथून गणेश शिंदे(36)आणि पुंडलिक हडकर(24) यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मियु आणि त्याचा दुसरा साथीदार मारियन ग्रामा(44) यांची माहिती मिळवली. नवघर पोलिसांनी दिल्लीला पथक रवाना करीत दिल्लीच्या कृष्णा नगर येथून या दोन रोमानियनना अटक केली. त्यांच्याकडून चार लाख 1 हजार रुपये, सहा मोबाईल आणि या गुन्ह्यात वापरलेला आणि तोडून टाकण्याचा प्रयत्न केलेला लॅपटॉप आणि सात विविध बँकांचे बनावट एटीएम पोलिसांनी जप्त केले.या टोळीने तब्बल 1551 जणांचा एटीएम डेटा  नवघरच्या एटीएम मधून जमा केला होता. परंतु नवघर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने हे सर्व कार्ड त्वरित ब्लॉक केल्याने आणखी नागरिकांना त्यांना लुटणे शक्य झाले नाही. या रोमानियन नागरिकांवर या अगोदरही असे गुन्हे दाखल आहेत. या चारही आरोपींना पाच जानेवारीपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.