Fri, Nov 16, 2018 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसकडून संविधानाचा अपमान

काँग्रेसकडून संविधानाचा अपमान

Published On: Apr 13 2018 1:34AM | Last Updated: Apr 13 2018 1:25AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

संसद हे सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे माध्यम आहे. मात्र, संसदेचे काम बंद पाडून विरोधक संविधानाचाच अपमान करीत आहेत. त्यांच्या या कृतीबद्दल देशातील जनता त्यांना जाब विचारेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

संसदेचे कामकाज बंद पाडण्याच्या विरोधकांच्या कृतीच्या निषेधार्थ भाजपने गुरुवारी देशभर एक दिवसीय उपोषण केले. राज्यातही विविध ठिकाणी भाजप नेत्यांनी उपोषण करून विरोधकांचा निषेध नोंदविला. विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आलेल्या उपोषणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. 
यावेळी खा. पूनम महाजन, खा. परेश रावल, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. आशीष शेलार, आ. पराग अळवणी उपस्थित होते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे यांनी औरंगाबाद येथे उपोषण केले. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे व त्याचे काम रोखून काँग्रेस पक्ष व त्याचे अध्यक्ष राहुल गांधी संसदेचा अपमान करत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष भाजपाशी स्पर्धा करू शकत नाही. त्यामुळेच संसदेचे काम बंद पाडत आहे व जनतेची दिशाभूल करत आहे, असा हल्ला यावेळी दानवे यांनी चढविला.

काँग्रेसकडून खालच्या स्तराचे राजकारण- रेल्वे मंत्री गोयल

ठाणे : मुद्दे नसल्याने काँग्रेस नेत्यांकडून खालच्या स्तरावरील राजकारण सुरू असल्याची टीका रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेससह विरोधकांनी घातलेल्या गोंधळाविरोधात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. यावेळी आमदार संजय केळकर, भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले, महिला आघाडीच्या माधवी नाईक, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी सहभागी झाले होते.

Tags : Mumbai, Constitution, Congress, Insult, Chief Minister Devendra Fadnavis,  Mumbai news,