Fri, Apr 26, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपला सापडली नवी वोट बँक!

भाजपला सापडली नवी वोट बँक!

Published On: Feb 17 2018 4:24PM | Last Updated: Feb 17 2018 4:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

देशातील सर्व राजकीय पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यात सत्ताधारी भाजप सर्वात आघाडीवर आहे. गेल्या साडेतीन वर्षात मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच नवा मतदार कसा मिळेल यासाठी पक्षाने प्रयत्न सुरु केले आहेत. लोकसभेत नुकताच मंजूर झालेला तिहेरी तलाक विरोधी कायदामुळे भाजपला लोकसभा 2019साठी नवा मतदार मिळाला आहे. या मतदाराने प्रत्यक्षात पक्षाला मते द्यावीत यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.

तिहेरी तलाक विरोधी लोकसभेत मंजूर झाल्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भलेही हे विधेयक अद्याप राज्यसभेत मंजूर झाले नसले तरी या निमित्ताने मुस्लिम महिलांचा एक नवा व्होट बँक पक्षाला मिळण्याची शक्यता आहे. म्हणूनच भाजपने महाराष्ट्रातील मुस्लिम भागातून एक यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुस्लिम महिलांना मोदी सरकार त्यांच्या अधिकारांसाठी त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाणार आहे. 

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील 150 मुस्लिम महिलांना 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण संघाच्या सल्ल्याने मुंबई शहराच्या जवळ रामभाऊ महालगी प्रबोधनीत दिले जाणार आहे. यात मोदी सरकारने तिहेरी तलाक विरोधी विधेयकामुळे मुस्लिम महिलांचे परिस्थिती कशी सुधारली आहे. पक्ष, सरकार देशासाठी काय करत आहे याची माहिती दिली जाणार आहे. 

प्रशिक्षणानंतर या महिला चार मार्चपासून राज्यातील विविध भागात जाऊन मुस्लिम भागात सभा घेणार आहेत. यातील काही सभांना भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशमधील 2017च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने अशाच प्रकारे निवडणुकीची तयारी केली होती. त्याला मिळालेल्या यशामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारे सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2011च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 11.23 कोटी आहे. त्यापैकी मुस्लिम लोकसंख्या 11.54 टक्के इतकी आहे. यानुसार राज्यात तब्बल 1.29 कोटी मुस्लिम मतदार आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुस्लिम भागात अशा सभा घेण्यात आल्या होत्या येथे भाजपला चांगली मते मिळाली होती. महाराष्ट्रात सुद्धा या सभांना यश मिळेल, असे पक्षाला वाटते. 

निवडणुकीचे राजकारण नव्हे

पक्षाच्या या कार्यक्रमाला निवडणुकीच्या राजकारणाशी जोडू नये, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले. या सभांद्वारे पक्ष अल्पसंख्यांक समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या प्रगतीसाठी मोदी सरकारने जी पावले उचलली आहेत. त्याबाबत माहिती करून देणे हा या मागचा उद्देश असल्याचे भंडारी म्हणाले. 

मुस्लिम महिलांना काय वाटते?

तिहेरी तलाक विरोधी कायद्यासाठी आग्रही असलेल्या भाजपचा राजकारण आणि त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याबद्दल मुस्लिम महिलांमध्ये वेगवेगळी मते आहेत. भारतीय मुस्लिम आंदोलन संघटनेच्या सहसंस्थापक नुरजहां नियाज यांनी सांगितले की, मुस्लिम महिलांच्या मुद्दयावर होणारे राजकारण नवे नाही. काँग्रेसने देखील यावर राजकारण केले. 1986मध्ये शहा बानो प्रकरणात काँग्रेसने चुकीचा निर्णय घेतला.त्यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे मत काँग्रेसने विचारात घेतले. अर्थात यासाठी भाजपला दोषी ठरवता येणार नाही. त्यावेळच्या आणि आताच्या परिस्थितीत इतकाच फरक आहे की, आता महिलांचे मत विचारात घेतले जात आहे.  

तर मुस्लिम महिलांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या रजिया पटेल यांच्यामते, भाजप मुस्लिम महिला व पुरुष यांच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे मुख्य उद्दिष्ट मुस्लिम महिलांची व्होट बँक मिळवणे हाच आहे.