Tue, Jul 23, 2019 18:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदकडे अंगडियामार्फत पोहोचायचा पैसा

दाऊदकडे अंगडियामार्फत पोहोचायचा पैसा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

दाऊदला मुंबईतून आर्थिक मदत करणारे बिल्डर, व्यापारी, सट्टा व मटका किंग आदी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. अनेक प्रकारे डी कंपनीला आर्थिक स्रोत पुरवणार्‍यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असून दाऊदला मुंबईतून कोण व कशी मदत करतात याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी दाऊदचा अटकेत असलेला फायनान्सर आणि मटका किंग पंकज गांगर याने पोलीस कोठडीत असताना दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. गांगर दरमहा दाऊदचा भाऊ छोटा शकील यास अंगडीयामार्फत पैसे पाठवत होता, अशी माहिती खुद्द गांगरने पोलिसांना दिली असून ठाणे पोलीस दाऊदपर्यंत पैसा पोहोचवणार्‍या त्या अंगडियांच्या मागावर आहेत.

मुंबईतून डी कंपनीला दरमहा करोडो रुपयांची रसद बिल्डर, व्यापारी आणि काही सट्टा व मटका किंग यांच्याकडून पुरवली जात असल्याचा खुलासा मटका किंग गांगरच्या चौकशीतून झाला आहे. 

मुंबईतून होणार्‍या आर्थिक पुरवठ्याच्या बळावरच डी कंपनी उत्तर प्रदेश, बिहार व इतर प्रांतातून काही शूटर बोलवून दहशत पसरवत  असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुंबईतून होणार्‍या आर्थिक स्त्रोतांचा बहुतांश पैसा हत्यार व बंदुक खरेदीसाठीही केला जातो. 

मुंबईतून दाऊदला दरमहा करोडोंची रसद अंगडीयामार्फत पोहचत असून हे आर्थिक रसद पोहचवणारे कोण याचा कसून शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. दाऊदचे मुंबईतील आर्थिक स्त्रोतांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी मटका किंग व दाऊदचा फायनान्सर पंकज गांगर यास बोरीवलीतून अटक केली होती.