Sat, Apr 20, 2019 08:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर

Published On: Feb 20 2018 2:00AM | Last Updated: Feb 20 2018 1:55AMमुंबई : खास प्रतिनिधी

बदललेल्या उद्योगस्नेही धोरणांमुळे आता महाराष्ट्रात गुंतवणूक करणे आश्‍वासक झाले असून पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असल्याने, येत्या दहा वर्षांत महाराष्ट्राचे चित्रच बदलून जाईल, असा समाधानकारक सूर आज मॅग्‍नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेत उद्योजकांच्या विविध परिसंवादातून उमटला. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अनेक परिसंवाद आणि चर्चासत्रांतून गुंतवणूकदार उद्योजकांसह प्रशासकीय अधिकारीदेखील सहभागी झाले.

रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गासंदर्भात सादरीकरण केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यामुळे 14 शहरे जोडली जाणार आहेत. त्या परिसरात हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेतच, शिवाय त्या-त्या भागातील पायाभूत सुविधांचाही विकास होणार आहे.

राज्यातील निर्माणाधीन असलेल्या रस्त्यांच्या जाळ्यांची आणि समृद्धी महामार्गाबाबत सविस्तर माहिती देताना मोपलवार यांनी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयांची  गुंतवणूक राज्य सरकार करीत असल्याची माहिती दिली. मुंबई-पुणे महामार्ग तयार करताना आलेल्या अडचणी आणि  तयार झाल्यानंतर लक्षात आलेल्या कमतरता यांचा सर्वंकष विचार करून समृद्धी महामार्गाचे नियोजन करण्यात येत आहे. एकमेकांना छेद देणार्‍या 19 ठिकाणी अत्याधुनिक वसाहती निर्माण करण्यात येत आहेत. हा महामार्ग तयार होत असताना आणि झाल्यानंतर 30 हजार प्रत्यक्ष आणि 60 हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होणार आहे, असे मोपलवार म्हणाले.

पायाभूत सुविधांमधून राज्याची प्रगती

वाढती वाहतूक आणि परवडणारी घरे, या दोन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी सरकारने आश्‍वासक पावले उचलली असून राज्यातील सबर्बन रेल्वे, मेट्रो आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यायी वाहतूक मार्ग तसेच विरार ते अलिबाग असा मल्टिमॉडेल कॉरिडोर तयार होणार आहे, अशी माहिती यू. पी. एस. मदान यांनी दिली. बीकेसी ते विमानतळ हे अंतर केवळ दहा मिनिटांत पोहोचण्याची व्यवस्था निर्माण होत असून राज्यभरात सुमारे 1 लाख 73 कोटींची कामे येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचे मदान यांनी सांगितले.