Sun, May 26, 2019 00:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आगामी निवडणुका टार्गेटवर

आगामी निवडणुका टार्गेटवर

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:15AMमुंबई : प्रतिनिधी

फैझल मिर्झा याच्या अटकेनंतर देशात येत्या काळात होणार्‍या निवडणूकाही अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली असून संर्पूण रॅकेट उध्वस्त होईपर्यंत धोका टळला नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मिर्झा याच्या चौकशीतून काहींची नावे समोर आली असून त्यांचाही शोध एटीएस घेत आहे. यातील काही जण भूमिगत झाल्याचे समजते. मिर्झा याच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबिय आणि नातेवाईकांकडे चौकशी सुरू असून तो दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता का, याचाही माहीती घेण्यात येत असल्याचे समजते. 

पाकिस्तानात प्रशिक्षण घेऊन एक दहशतवादी मुंबईत परतल्याची माहिती कोलकत्ता एटीएसकडून मिळताच एटीएसच्या जुहू कक्षातील पथकाने तपास करत बोरीवली परिसरात असताना मिर्झा याला 11 मे रोजी ताब्यात घेतले. त्याचे दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध आणि त्याने प्रशिक्षण घेत असलेल्या शिबिराला आयएसआयकडून आर्थिक मदत पुरविली जात असल्याचे उघड होताच एटीएसने त्याला बेड्या ठोकल्या. मुंबईसह गजबजलेली महानगरे अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती मिर्झाच्या चौकशीतून समोर आली आहे.

मूळचा बंगळूरु येथील रहिवाशी असलेला मिर्झा हा लहानपणापासून मुंबईत वास्तव्यास असून इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता. चुलत भावाच्या मार्फत तो दहशतवादी संघटना आणि अंडरवर्ल्डशी संबंधीत असलेल्या फारुख देवाडीवालाच्या संर्पकात आला. देवाडीवालानेच त्याला शारजहाला नेले आणि तेथून कराचीमार्गे पाकिस्तानात पाठवले. कराची विमानतळावर उतरुन मिर्झा प्रशिक्षणाला पाकिस्तानातील केंद्रावर पोहोचला.  त्याला अद्ययावत शस्त्रे चालविणे, बॉम्ब बनविणे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पर्यटन व्हिसाद्वारे मिर्झा मुंबईत आल्याची माहिती मिळाल्यानंतर तब्बल 37 ठिकाणी शोध घेतल्यानंतर हातात सापडल्याचेही अधिकार्‍याने स्पष्ट केले. तो मुंबईमध्ये आत्मघातकी हल्ला करणार असल्याचे उघड झाले असून अतिरेक्यांच्या टार्गेटवर अतिमहत्वाच्या व्यक्तीही असल्याची माहिती मिळाली आहे.