Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माहिती अधिकार कार्यकर्त्यांना समन्स

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना समन्स

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या संदर्भात ठाणे महापालिकेने पोलिसांना अहवाल सादर केल्यानंतर 10 माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले आहे. समन्स बजावण्यात आलेल्या एका कार्यकर्त्याची खंडणी विरोधी पथकाने बुधवारी चौकशी केल्याची माहिती पथकाचे पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमीरे यांनी दिली आहे. उर्वरित कार्यकर्त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे खंडणी विरोधी पथकाने स्पष्ट केले आहे. 

विधिमंडळात उपस्थित झालेली लक्षवेधी, त्यानंतर मंत्रालयातून आलेले चौकशीचे आदेश आणि ठाणे महापालिकेने सादर केलेला अहवाल या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाने हे समन्स बजावले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना ठाण्यातील वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या विरोधातील लक्षवेधी सूचना विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडली होती. त्यानंतर ठाणे महापालिकेने आपले उत्तर सरकारला सादर केले होते.

याप्रकरणी चौकशी करून दोषी आढळणार्‍या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्‍वासन सरकारच्यावतीने देण्यात आले होते. त्यानंतर सरकारने ठाणे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करावी असे आदेश दिले. आयुक्त परमबीर सिंग यांनी खंडणी विरोधी पथकाकडे हे प्रकरण सोपवले .  

या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकी प्रदीप शर्मा  यांनी पालिकेकडून आरटीआय कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीचा  अहवाल मागितला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेने समिती गठीत जरून यासंदर्भातील  अहवाल  ठाणे पोलिसांना 8 मार्च रोजी सादर केला होता. त्यात वादग्रस्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या नावांचाही उल्लेख आहे. यापैकी पहिल्या 10 जणांना खंडणी विरोधी पथाने समन्स धाडले आहे. चौकशीसाठी हजर राहण्याची तारीख आणि वेळ प्रत्येकाला या समन्समध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी एका वादग्रस्त कार्यकर्त्याला बोलावण्यात आले होते. त्याच्याकडून जुजबी माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी काही कागदपत्रांची विचारणा केली असून ती घेऊन येण्याचे आदेश या कार्यकर्त्याला देण्यात आले आहेत. उर्वरीत जणांची चौकशीसुध्दा सुरू होणार असल्याचे राजकुमार कोथमीरे यांनी सांगितले.


  •