Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसई-विरारच्या पूरग्रस्त पट्ट्यात आता महागाई

वसई-विरारच्या पूरग्रस्त पट्ट्यात आता महागाई

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 14 2018 12:53AMवसई/ विरार ः पुढारी वृत्तसेवा

मुसळधार पावसाने सर्वत्र निर्माण झालेल्या पूरस्थितीत वसई-विरार आणि नालासोपार्‍यातील रहिवाशांना कृत्रिम महागाईने गाठले असून दूध 80 रुपये लिटरने घ्यावे लागते तर रिक्षा भाडे थेट 100 रुपयांवर पोहोचले आहे. 

ज्या ठिकाणी जाण्यासाठी एरव्ही 10 रुपये लागतात, अशा ठिकाणी जाण्यासाठी 50 ते 60 तर काही रिक्षावाले थेट 100 रुपयांची मागणी करत आहेत. अशीच दरवाढ दूधविक्रेत्यांकडूनही करण्यात आली. तीन दिवस शहराला दूधपुरवठाच झाला नसल्याने ज्या दूधविक्रेत्यांकडे दूध होते, त्यांनी 40 रुपयांऐवजी थेट 70 ते 40 रुपये लिटरमागे मागण्यास सुरुवात केली. एकीकडे पावसाने बेहाल केले असताना, दूध आणि रिक्षावाल्यांनी नागरिकांच्या हालात भर टाकल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

वीजपुरवठा पुन्हा खंडित

मुसळधार पावसात वसई, नालासोपारा आणि विरार शहरांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, मात्र बहुतेक ठिकाणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये पाणी गेल्याने आणि काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट होऊ लागल्याने वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्यात आला असून  सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. विरारच्या काही भागांना थेट वसईतून वीजपुरवठा होतो, या भागात शुक्रवारीही वीजपुरवठा सुरू झाला नव्हता. जीवदानी रोड, आण्णापाडा, पापडखिंड या झोपडपट्टीवजा आदिवासी वस्तींत आकडा टाकून वीज घेण्यात येते, येथे वीजपुरवठा सुरू होताच  ट्रान्सफॉर्मरमध्ये स्फोट आणि स्पार्किंग झाले. हीच स्थिती विरार-मनवेलपाडा भागात होती.  नालासोपारा पश्चिमेकडेही रात्री उशिरापर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू होता. परिणामी चौथ्या दिवशीही वसई, नालासोपारा आणि विरारकरांच्या हाल अपेष्टांना पारावार उरलेला नाही. 

नवघर इंडस्ट्रीजचे सव्वा कोटींचे नुकसान

गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे वसई पूर्व येथील नवघर औद्योगिक क्षेत्राचे सुमारे सव्वाशे कोटींचे नुकसान झाले. हे नुकसान कसे भरून काढायचे, असा प्रश्न उद्योजकांसमोर आवासून उभा राहिला आहे.  नवघर औद्योगिक क्षेत्रात सुमारे हजार ते बाराशे छोटे-मोठे कारखाने आहेत. या सर्व कारखान्यात पाणी शिरल्याने मशिनरी बंद झाल्या. कच्चा-पक्का माल भिजून खराब झाला. चार दिवस पाणी न उतरल्याने काम बंद झाले. साफसफाईसाठी आणखी चार-पाच दिवस कारखाने बंद राहणार आहेत. या आठ दिवसांत करोडोचे नुकसान होत आहे. पावसामुळे गेल्या 30 वर्षांत प्रथमच अशा प्रकारे नुकसान झाल्याचे नवघर इंडस्ट्रीज असो. चे अध्यक्ष अनिल आंबार्डेकर यांनी सांगितले. मनपा, शासनाने या प्रश्नी लक्ष घालून भरपाई द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.