Mon, May 20, 2019 22:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडली

इंद्राणी मुखर्जीची प्रकृती बिघडली

Published On: Apr 08 2018 2:13AM | Last Updated: Apr 08 2018 1:28AMमुंबई :

शिना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या अडीच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. त्यानंतर कारागृह प्रशासनाने तिला त्वरित जे. जे. रुग्णालयात दाखल केले. इंद्राणी मुखर्जीला नेमके काय झाले आहे, ते समजू शकलेले नाही. तिच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. 

दरम्यान, बहुचर्चित शिना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिनाची आई इंद्राणी मुखर्जी व तिचा दुसरा व तिसरा पती म्हणजे संजीव खन्‍ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर विशेष सीबीआय न्यायालयाने शिनाच्या हत्येचा कट रचून तिची हत्या केल्याचा आरोप निश्‍चित केला आहे. तिघांनीही त्यांच्यावरील हा आरोप अमान्य केला आहे. तिचा माजी चालक आणि याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनलेला श्यामवर राय याला पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली होती. पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा राहुल आणि शिना यांच्यामधील प्रेमसंबंध पसंत नसल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. मालमत्तेचा मुद्दाही यात आहे.

Tags : mumbai, mumbai news, Indrani Mukherjee, condition, worsened, Shina Bora murder case, main accused,