होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इंद्राणी मुखर्जीने ड्रग ओव्हरडोस कारागृहाबाहेरच घेतला होता

इंद्राणी मुखर्जीने ड्रग ओव्हरडोस कारागृहाबाहेरच घेतला होता

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:10AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या ड्रग ओव्हरडोस प्रकरणाचा तपास करणार्‍या भायखळा कारागृहाच्या अधिकार्‍यांनी आपला अहवाल कारागृह विभागाचे अतिरीक्‍त पोलीस महासंचालक बी. के. उपाध्याय यांना सादर केला आहे. इंद्राणीने कारागृहाच्या बाहेर ड्रगचा ओव्हरडोस घेतला होता, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

6 एप्रिल रोजी इंद्राणीने बेन्झोडायझेपाईन या द्रव्याचे सेवन केले होते. हे द्रव्य सेवन करण्याची सूचना कारागृहाच्या डॉक्टरांनी केली नव्हती. अत्यवस्थ वाटू लागल्यामुळे 6 एप्रिलच्या रात्रीच इंद्राणीला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंद्राणीला ड्रग ओव्हरडोस झाल्याचा निष्कर्ष जेजेच्या डॉक्टर्सनी काढला होता. अशा एका प्रकारामुळे इंद्राणीला 2015 साली रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र त्यावेळी तिने ड्रग ओव्हरडोस घेतला नव्हता. अपचन, वजनात झालेली घट आणि अशक्‍तपणामुळे तिला अत्यवस्थ वाटत असल्याचे स्पष्टीकरण कारागृह प्रशासनाने दिले होते. 

6 एप्रिल रोजी घडलेल्या प्रकारासंदर्भात कारागृह प्रशासनाचा अहवाल आपल्याला प्राप्‍त झाला आहे. त्याचा अभ्यास केला जात आहे. ती गोपनीय बाब असून त्यासंदर्भात काही बोलता येणार नाही, तो राज्य सरकारला सादर केला जाईल, असे उपाध्याय यांनी म्हटले आहे.