नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानाने पिटाळून लावणारे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना 'वीरचक्र'ने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून आज (ता.१४) घोषणा करण्यात आली. त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी त्यांचा सन्मान होणार आहे. स्वातंत्र्यदिनी हा पुरस्कार प्रदान होईल. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत शिरलेले पाकिस्तानचे एफ-16 विमान अभिनंदन यांनी पाडले होते.
भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी विमानांना पळवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले. या घटनेत त्यांचेही लढाऊ मिग-२१ विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. यावेळी त्यांचेही विमान कोसळले, पण ते पॅराशूटच्या सहाय्याने खाली आले. खाली आल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या अभिनंदन हाती लागले.
त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलाकडून वीरचक्र या शौर्य पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती. देशासाठी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल सैन्य दलांतील जवानांना दिले जाणारे परमवीर चक्र, महावीर चक्र या दोन सर्वोच्च शौर्य पुरस्कारानंतर वीरचक्र हा पुरस्कार दिला जातो.
विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवले होते. शत्रू राष्ट्राला देशासंबंधी कोणतीही संवेदनशील माहिती कळू दिली नव्हती. त्यानंतर ते सुखरूप मायदेशात परतले होते.