Sun, Jul 12, 2020 23:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिंताजनक! जगातील सर्वांधिक कोरोनाप्रभावित देशांच्या क्रमवारीत भारत १० व्या स्थानी

कोरोनाचा प्रादुर्भाव; भारत जगात १० व्या स्थानी

Last Updated: May 25 2020 4:34PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

सलग चौथ्या दिवशी देशात सहा हजारांहून अधिक कोरोनबाधितांची उच्चांकी नोंद घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच एकाच दिवशी सात हजारांच्या घरात कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. गेल्या एका दिवसात तब्बल ६ हजार ९७७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली, तर १५४ जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या त्यामुळे १ लाख ३८ हजार ८४५ झाली आहे. जगातील सर्वाधित कोरोनाप्रभावित देशांच्या क्रमवारीत इराणला मागे टाकत भारताने १० व्या स्थानी झेप घेतली आहे. इराणमध्ये सोमवारी सकाळपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३५ हजार ७०१ होती.
 
दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोनामुक्तीचा दरही वाढत्या रूग्णसंख्येप्रमाणे सातत्याने वाढत आहे. ४१.५७ टक्के कोरोनामुक्तीच्या दराने आतापर्यंत देशभरात ५७ हजार ७२१ नागरिकांनी कोरोनावर मात मिळवली आहे. गेल्या एका दिवसात ३ हजार २८० नागरिक कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीचा व्यापही वाढवण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) रविवारी सकाळपर्यंत १ लाख ८ हजार ६२३ वैद्यकीय तपासण्या केल्या. देशात आतापर्यंत २९ लाख ४३ हजार ४२१ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या एका दिवसात बिहार, महाराष्ट्र तसेच तामिळनाडूत सर्वाधित कोरोनाग्रस्त आढळून आले. बिहारमध्ये पहिल्यांदाच एका दिवसात २०७ कोरोनाबाधित ​आढळले. यासह देशात कोरोनामुळे मरणाऱ्यांच्या संख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला आहे. देशात या संसर्गामुळे ४ हजार २१ जणांचा मृत्यू झाला आहे. लागोपाठ चौथ्या दिवशी कोरोनाबाधित सर्वाधित संख्येत आढळून आले आहे. यापूर्वी रविवारी ६ हजार ७६७ रूग्ण आढळेल होते. २३ मे ला ६ हजार ६५४, तर २२ मे ला ६ हजार ८८ कोरोनाग्रस्त आढळले होते. 

दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधित कोरोनाग्रस्तांची नोंद

राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी सर्वाधित कोरोनाबाधितांची नोंद घेण्यात आली. सोमवारी एका दिवशी ६३५ कोरोनाग्रस्त आढळून आले, तर १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्ली सरकारने दिली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत ही माहिती समाविष्ठ करण्यात आलेली नाही. दिल्लीत त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ५३ झाली आहे. तर, आतापर्यंत २७६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पंरतु, दिल्लीत सर्वाधिक कोरोनामुक्तीचा दरही नोंदवण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील ६ हजार ७७१ नागरिकांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 

महाराष्ट्र- सर्वाधिक कोरोनाप्रभावित राज्य 

सर्वाधित कोरोनाप्रभावित महाराष्ट्रातील रूग्णांची संख्या ५० हजार २३२ झाली असून १ हजार ६३५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १४ हजार ६०० नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. पंरतु, राज्यातील कोरोनामुक्तीचा दर मंद असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी १४ हजार ५६ झाली. राज्यात ८५८ कोरोनाग्रस्तांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तामिळनाडूतील १६ हजार २७७ कोरोनाबा​धितांपैकी १११ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशातील ६ हजार ६६५ कोरोनाग्रस्तांपैकी २९० जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात एकूण ६ हजार २६८ कोरोनाबाधित आहेत. यातील १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह पश्चिम बंगालमध्ये ३ हजार ६६७ कोरोना​ग्रस्तांपैकी २७२ जणांचा मृत्यू झाला आहे. 

देशातील कोरोनाची स्थिती (सोमवारी संध्याकाळी ५ वाजतापर्यंत) 
एकूण कोरोनाबाधित - १ लाख ३८ हजार ८४५
सक्रिय रूग्ण - ७७ हजार १०३
कोरोनामुक्त- ५७ हजार ७२०
मृत्यू- ४ हजार २१