Sat, Aug 17, 2019 17:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला रिक्षाचालकांची स्वतंत्र संघटना?

महिला रिक्षाचालकांची स्वतंत्र संघटना?

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 1:28AMठाणे ः अनुपमा गुंडे

गुलाबी रिक्षाच्या माध्यमातून ठाण्यात 400 महिला रिक्षाचालकांनी राज्यात नवा आदर्श घालून दिला असून त्या आपल्या व्यवसायात खूष आहेत. मात्र काही समव्यवसायी बांधवांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटनेची स्वतंत्र चूल मांडण्याचा विचार काही महिला रिक्षाचालकांनी दैनिक पुढारीशी बोलतांना व्यक्त केला.

राज्यात महिला रिक्षाचालकांना परवाना देण्याचा पहिला मान ठाणे शहराला जातो. गेल्या 3 वषार्ंपासून ठाणे शहरात महिला रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर या व्यवसायात आहेत. ठाण्यात सध्या 400 च्या आसपास महिला रिक्षाचालक आहेत. महिला रिक्षाचालकांना प्रादेशिक परिवहन, वाहतूक पोलीस, महिला व पुरूष प्रवाशांकडून चांगले सहकार्य मिळत आहे, मात्र काही पुरूष रिक्षाचालकांकडून विशेषतः रिक्षा स्टॅन्डवर थांबा मिळण्याबाबत सहकार्य मिळत नसल्याने बहुतांश महिला रिक्षाचालक वैतागल्या आहेत. या आणि इतर प्रश्‍नांवर सरकार दरबारी न्याय मिळावा, तसेच संघटनात्मक ताकद असावी, यासाठी स्वतंत्र महिला संघटनेची चूल मांडण्याच्या विचारात आहेत. 

बहुतांशी महिला रिक्षाचालक या सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 4 ते 10 पर्यंत प्रवासी वाहतूक करतात. घरातील जबाबदार्‍या सांभाळून महिला संसाराला हातभार लावण्यासाठी या रिक्षाचालक शेअरिंग तत्वावर रिक्षा चालविणे पसंत करतात. मात्र सगळ्याच रिक्षा स्टॅन्डवर पुरूष रिक्षाचालक सहकार्य करत नसल्याचा 90 टक्के महिला रिक्षाचालकांचा अनुभव आहे. लोकमान्य नगर, वागळे इस्टेट (आशर पार्क), नितिन कंपनी तसेच अन्य उपनगरांमध्ये शेअरिंगमध्ये रिक्षा चालविणार्‍या महिलांना पुरूष रिक्षाचालक रांगेत रिक्षा लावू देत नाहीत, काही वेळा टाकून बोलतात, टोमणेबाजी करतात, काही वेळा दमदाटीही करतात, अशा प्रसंगांना महिला रिक्षाचालकांना सामोरे जावे लागत आहे. अशा अनुभवामुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण होऊन या व्यवसायात महिलांची संख्या वाढणार कशी, असा सवाल महिला रिक्षाचालकांनी केला आहे. यामुळे ठाण्यातील काही उपनगरांमध्ये तसेच ठाणे स्थानकात महिलांना स्वतंत्र रिक्षा स्टॅन्ड असावे, यासाठी काही महिलांनी सरकारदरबारी पाठपुरावा केला आहे, मात्र अजूनही वाहतूक पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याची खंत या महिलांनी दैनिक पुढारीशी बोलतांना नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे. 

महिला रिक्षा स्टॅन्डच्या प्रमुख मागणीशिवाय महिला रिक्षाचालकांची आणखी एक प्रमुख मागणी आहे, ती म्हणजे, महिलेच्या प्रसूतीच्या काळात, शस्त्रक्रिया झाल्यास किंवा मोठा आजार असल्यास त्या काळात आपल्या पुरूष नातेवाईकांना रिक्षाचालकांना  काही काळापुरती रिक्षा चालविण्याची परवानगी द्यावी. आमच्यातील 100 टक्के महिला ह्या स्वतःचे घरदार सांभाळून कुटुंबाला हातभार म्हणून रिक्षा चालवितात. कर्ज काढून अनेकींनी रिक्षा घेतल्या आहेत, रोज मिळणार्‍या पैशातून काटकसर करत रिक्षाचा हप्ता आणि कुटुंबाची गुजराण महिला करतात. मात्र  गरोदरपणाच्या काळात नंतर मुलांना सांभाळण्यासाठी महिलांना स्वतःच्या तसेच मुलांच्या देखभालीसाठी गरज म्हणून आमच्या कुटुंबातील पुरूष (भाऊ, पती किंवा अन्य नातेवाईकांना ) रिक्षाचालकांना रिक्षा चालविण्याची मुभा द्यावी, रिक्षांवर महिला चालक ठेवणे परवडणारे  नसून महिला रिक्षाचालकांची संख्याही अपुरी आहे.