Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत स्वतंत्र महारेरा लवाद

मुंबईत स्वतंत्र महारेरा लवाद

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई : प्रतिनिधी

बिल्डर लॉबीला चाप लावणार्‍या महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन प्राधिकरणाच्या (महारेरा)  स्वतंत्र लवादाला अखेर जागा मिळाली असून, काळा घोडात या लवादाचे कामकाज महिनाभरात सुरू होईल. महाराष्ट्र सरकारने महारेरा कायदा तयार करून प्राधिकरणाची  1 मे 2017 रोजी स्थापना केली. त्यानंतर 13 महिन्यांचा कालावधी गेल्यानंतरही रेराच्या कायद्यानुसार महारेरा न्यायाधिकरणाचे स्वतंत्र कामकाज  सुरू करण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. मुख्य अडचण जागेची होती. वांद्रे तसेच दक्षिण मुंबईत अनेक जागा पाहण्यात आल्या. त्यातून दक्षिण मुंबईतील काळाघोडा येथील साडेचार हजार चौ.फुटाची जागा निश्चित करण्यात आली आहे.

काळाघोडा परिसरात महिनाभरात महारेरा न्यायाधिकरणाचे (लवाद) कामकाज सुरू केले जाणार असल्याची माहिती मंत्रालयातील एका उच्चपदस्थ अधिकार्‍याने दिली.घर खरेदी करणार्‍या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी, रेरा कायद्याच्या कलम 49 (1) याखाली दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्‍यांसाठी रेरा न्यायाधिकरण स्थापन करणे ही सरकारची जबाबदारी असते. परंतु रेरा न्यायाधिकरण  अद्याप स्थापन केले नसल्याने  विकासक आणि घर खरेदी करणार्‍या अनेक ग्राहकांनी महारेराच्या निर्णयाविरोधात  थेट उच्च न्यायालयात अपील केले होते. राज्य सरकारच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लवादाचे स्वतंत्र कामकाज सुरू होईपर्यंत  सध्या  महसूल विभागाच्या लवादाकडे अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.