Sat, Apr 20, 2019 10:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालय

Published On: Apr 11 2018 1:41AM | Last Updated: Apr 11 2018 12:49AMमुंबई : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे सध्याच्या पोलीस यंत्रणेवर ताण येत होता. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता पिंपरी चिंचवड मध्ये स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट यांनी दिली.

वाढती लोकसंख्या व औद्योगिकरणामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक गंभीर समस्या शहरात निर्माण होत आहे. या ठिकाणी पोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मंत्रिमंडळ बैठकीत पुणे शहर पोलीस आयुक्त आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली. त्यासाठी 2 हजार 633 नवीन पदांच्या निर्मिती करण्यासही मंजुरी देण्यात आली असून ही पदे टप्प्याटप्याने भरण्यात येणार असल्याचे बापट यांनी सांगितले.

नवीन आयुक्तालयासाठी 4,840 पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पुणे शहर पोलीस आयुक्त व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरुन 2,207 पदे वर्ग करण्यात येणार आहेत. उर्वरित 2,633 पदांची निर्मिती तीन टप्प्यांत करण्यात येईल.

Tags : mumbai, mumbai news, Pimpri Chinchwad, Independent, Police Commissionerate,