Sun, Sep 23, 2018 19:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ईएमआय वाढणार!

ईएमआय वाढणार!

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:14AMमुंबई : वृत्तसंस्था

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले असून, वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्‍तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरणाचा आढावा घेतला होता. त्यानंतर रेपो दरात कपात होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक बँकांना होती. मात्र या वाढीमुळे ती फोल ठरली. अर्थात बँकांकडे असलेल्या निधीच्या रोखतेवर कर्जावरील व्याजदराची वाढ अवलंबून आहे, असे स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्‍लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय बुधवारी दुपारी जाहीर केला. 2018-19 मधील हे तिसरे द्वैमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्‍का रेपो रेट वाढवित 6.25 टक्के केला होता. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल, असा अंदाज व्यक्‍त केला जात होता. बुधवारी अपेक्षेनुसार रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली. या वाढीनंतर रेपो रेट 6. 50 टक्के इतका झाला आहे.तर रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने हा दर आता  6.25 टक्के झाला आहे.  

आंतरराष्ट्रीय व्यापारात सध्या आव्हानात्मक स्थिती असून, भारताच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होण्याची भीती पतधोरणाच्या बैठकीत व्यक्‍त करण्यात आली आहे. मात्र, भारताची अर्थव्यवस्था या आर्थिक वर्षात आधी अंदाज केलेल्या 7.4 टक्के दराने वाढेल, यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले आहे.