Thu, Apr 25, 2019 15:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दलितांवरील वाढते हल्ले चिंताजनक : आठवले

दलितांवरील वाढते हल्ले चिंताजनक : आठवले

Published On: May 12 2018 1:48AM | Last Updated: May 12 2018 1:30AMकोरेगाव-भीमा : प्रतिनिधी

दलित समाजावरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून, हल्लेखोरांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूजा सकट प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. सुरेश सकट कुटुंबीयांचे पुणे शहरात लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वाडा (ता. शिरूर) येथे पूजा सकट हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले आले होते, त्यानंतर ते बोलत होते. पूजा सकट हिची आत्महत्या नसून, ती हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

तसेच जे कोणी या घटनेशी संबंधित आरोपी असतील, त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकट कुटुंबाचे पूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असून, अशी घटना परत घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना आठवले यांनी केली.

केंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) कोरेगाव-भीमा प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिथिल झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि बढत्यांमधील आरक्षण आदी मुद्द्यांवर ठोस भूमिका घेता आलेली नाही. त्यामुळे रिपाइंला  बॅकफूटवर जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करून आंबेडकरी जनता आपल्या पाठीशी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न रिपाइंकडून केला जाणार आहे. रिपाइंचे दोन दिवसांचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 27 व 28 मे रोजी पुण्यात होणार आहे.