Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वे अपघातात मृत प्रवाशांच्या संख्येत वाढ

रेल्वे अपघातात मृत प्रवाशांच्या संख्येत वाढ

Published On: Dec 31 2017 2:07AM | Last Updated: Dec 31 2017 1:15AM

बुकमार्क करा
ठाणे : अमोल कदम 

रेल्वे मार्गावरील मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने रेल्वे अपघात रोखण्याकरिता अनेक प्रयत्न केले. परंतु यात रेल्वे प्रशासनाला अपयश आल्याने मृत्यू तसेच अपघाताचे प्रमाण मावळत्या वर्षीही वाढलेलेच आहे. 

 रेल्वे प्रशासनाने मध्य, हार्बर व पश्‍चिम रेल्वे मार्गावर नियंत्रण ठेवण्याकरिता अपघात नियंत्रण समिती स्थापन केली होती, परंतु तरीही 2017 यावर्षी ठाणे ते कर्जत, कसारापर्यंत 956 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 855 जण जखमी झाले आहेत. जखमी तसेच मृतांच्या नातेवाईकांना अजूनही शंभर टक्के रेल्वेची मदत मिळाली नसल्याचे संबंधितांचे नातेवाईक सांगत आहेत. रेल्वे अपघात झाला की अपघातग्रस्ताला रेल्वे प्रशासनातर्फे तात्काळ मदत मिळणे गरजेचे आहे, परंतु ती मदत जखमी वा मृत झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकाला मिळण्याकरिता रेल्वे कार्यालयाच्या कित्येक फेर्‍या माराव्या लागत आहेत. यावर्षी रेल्वे अपघातामुळे कित्येक नागरिकांच्या घरातील कुटुंब प्रमुख, कुणाचा मुलगा, कुणाची आई तर कुणाची मुलगी, बहीण दगावली आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस हद्दीत ठाणे ते दिवा तसेच ठाणे ते ऐरोली पर्यंतचा परीसर येतो. डोंबिवली लोहमार्ग पोलीस हद्दीत डोंबीवली ते कोपर तसेच ठाकूर्लीपर्यंतचा परिसर येतो, कल्याण लोहमार्ग पोलीस हद्दीत कल्याण ते बदलापूर ते कसारा रेल्वे मार्गाचा परीसर येतो, तर कर्जत लोहमार्ग पोलीस हद्दीत वांगणी ते खोपोली तसेच मेल गाड्यांचा मंकीहीलपर्यंतचा रेल्वे मार्ग येत आहे.या रेल्वे मार्गावरील कल्याण लोहमार्ग हद्दीतील रेल्वे मार्गावर या चालू वर्षाच्या 30 तारखेपर्यंत 381 जणांचा सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. रेल्वे अपघाताची आकडेवारी पाहता अपघात रोखण्यावर रेल्वे प्रशासनाला यावर्षीही अपयशच आल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील येणार्‍या नवीन वर्षात तरी रेल्वे प्रशासनाने अपघात रोखण्याकरिता गांभीर्याने विचार करून अपघात शंभर टक्के कसे रोखता येथील याचा विचार करावा, असे रेल्वे अपघातात जखमी झालेले तसेच मृत्यू झालेल्यांचे नातेवाईक सांगत आहेत.