Mon, Aug 19, 2019 00:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा विद्यार्थ्यांच्या सवलतीत वाढ

मराठा विद्यार्थ्यांच्या सवलतीत वाढ

Published On: Aug 09 2018 2:06AM | Last Updated: Aug 09 2018 2:06AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. त्यातील काही अटींमुळे योजनेचा फायदा मिळविण्यात अडचणी येत असल्याची बाब समोर आल्यानंतर यामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्यानुसार योजनेचा फायदा मिळण्यासाठी विद्यार्थ्याने बायोमेट्रिक प्रणालीद्वारे 50 टक्के हजेरी लावणे  आवश्यक होते. मात्र, संबंधित संस्थेने परीक्षांसारख्या कारणांसाठी त्याचा वापर करावा. मात्र, फी सवलतीबाबत याची अंमलबजावणी करताना व्यवहार्यतेचे भान राखावे व त्याची सक्‍ती न करता टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करावी, अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.

शैक्षणिक   संस्थांनी  नॅक व एनबीएमार्फत  2018-19 पर्यंत मूल्यांकन वा पुनर्मूल्यांकन मिळविले पाहिजे. पुढे हे मूल्यांकन टिकले नाही, तर त्या संस्थांना यातून वगळण्यात येईल. ही अटही आता काढून टाकण्यात आली  आहे. याऐवजी आता  संबंधित शैक्षणिक संस्थेने अ‍ॅसेसमेंट व अ‍ॅक्रिडिटेशनसाठी केवळ अर्ज केला पाहिजे, अशी तरतूद  करण्यात आली आहे.