होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिअरप्रेमींवर सरकारी अवकृपा

बिअरप्रेमींवर सरकारी अवकृपा

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नववर्षाचे स्वाग म्हणजे बीअरचे फेसाळणारे जार.... पण यावर्षीच्या नववर्षाच्या उत्सवावर आणि बीअरच्या फेसावर सरकारी अवकृपा झाली आहे. सरकारकडून उत्पादन शुल्कात वाढ करण्यात आल्यानंतर कमाल विक्री किमतीत वाढ करण्याची कंपन्यांची विनंती सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उंचावणारे बीअरचे प्याले पढ्या भावाने खरेदी करावे लागणार आहेत. या दरवाढीस आठवडाभराने संमती दिली असती, तर कदाचित स्वागताचा उत्साह दुणावला असता. बीअर विक्रेत्यांनाही ही भीती सतावू लागली आहे. 

उत्पादन शुल्कात वाढ झाल्यामुळे कमाल विक्री किमतीत वाढ करावी, असा धोशा कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून लावला होता. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. साहजिकच बड्या बीअर कंपन्यांनी पुरवठा कमी केला. नामांकित ब्रँड बाजारातून दिसेनासे झाले. नववर्षाच्या तोंडावर मात्र किंमतवाढीची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. आता हा पुरवठा हळुहळू सुरळीत होईल, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. 

माईल्ड बीअरवरील उत्पादनशुल्कात 25 टक्के तर स्ट्राँग बीअरवरील उत्पादन शुल्कात 35 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे 330 मिलीची माईल्ड बीअर पिंट 3 रुपयांनी तर स्ट्राँग बीअरची पिंट 4.5 रुपयांनी महागणार आहे. 630 मिलीची माईल्ड बीअर बाटली 5 रुपयांनी तर स्ट्राँग बीअर 6.5 रुपयांनी महागणार आहे.  किंगफिशर, कार्ल्सबर्ग आणि बडवायझर या बीअरची पिंट 60-110 रुपयांदरम्यान आहे, तर याच ब्रँडची मोठी बाटली 110-230 रुपयांच्या दरम्यान आहे. बीअरवरील उत्पादन शुल्क उत्पादन किमतीवर ठरत असते. 35 टक्के मूल्यवर्धित कर आकारुन त्याची कमाल विक्री किंमत ठरत असते.

माईल्ड बीअरसाठी याआधी उत्पादन खर्चाच्या 150 टक्के किंवा 33 रुपये प्रति लीटर यापैकी जे अधिक असेल ते उत्पादन शुल्क आकारले जात होते. आता हेच प्रमाण 175 टक्के अथवा 42 रुपये प्रतिलीटर जे अधिक असेल ते असे आकारले जाणार आहे. स्ट्राँग बीअरसाठी हेच प्रमाण आधी 200 टक्के किंवा प्रतिलीटर 60 रुपये यापैकी जे अधिक असेल ते उत्पादनशुल्क होते, आता ते 235 टक्के किंवा 80 रुपये प्रति लीटर जे जास्त असेल ते याप्रमाणे आकारले जाणार आहे. उत्पादन शुल्क वाढीतून अतिरिक्‍त 175 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा होतील, असा सरकारचा अंदाज आहे. बीअरची महाराष्ट्रातील  विक्री 33 कोटी लीटर प्रतिवर्ष इतकी आहे. यातून सरकारच्या तिजोरीत 12 हजार 288 कोटी रुपये जमा होतात.