Sun, Mar 24, 2019 06:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दप्तरांसह ८वी, १०वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ

दप्तरांसह ८वी, १०वीच्या पुस्तकांच्या किमतीत वाढ

Published On: Jun 11 2018 1:34AM | Last Updated: Jun 11 2018 1:25AMठाणे : प्रतिनिधी

जून महिना उजाडला की वेध लागतात ते शैक्षणिक साहित्य खरेदीचे. मात्र, यावर्षी शैक्षणिक साहित्यांच्या किमतीत  वाढ झाली आहे. पूर्वी व्हॅट आणि एक्साईजसाठी 4.50 ते 5 टक्के कर अदा करावा लागत होता. मात्र, आता जीएसटीमुळे 14 टक्के कर भरावा लागत असल्याने दप्तरांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर यंदा इयत्ता 8 वी आणि 10 वीचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे या अभ्यासक्रमाच्या नवीन पुस्तकांच्या किमतीत 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती पुस्तक विक्रेत्यांनी दिली.

राज्यातील शाळा 16 जूनपासून सुरू होणार आहेत. यंदाही शिक्षण साहित्याच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षण अधिकच महागले असल्याचे दिसत आहे. त्यात ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील दप्तर, पुस्तके, वह्या अशा शाळेसाठी लागणार्‍या साहित्यांच्या दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. तसेच यंदाच्या वर्षी इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने, या दोन्ही इयत्तांची नवीन पुस्तके बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र, या नवीन पाठ्यपुस्तकांच्या किमतीत देखील 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती माझे ग्रंथ भंडारचे मंदार मेहेंदळे यांनी दिली.

शाळेच्या खरेदीमधील मोठा घटक म्हणजे दप्तर. यावर्षी लहान मुलांसाठी आलेल्या दप्तरांमध्ये छोटा भीम आणि त्याच्याबरोबरच चुटकी, कालिया यांचे वर्चस्व दिसत आहे. लहान मुलांसाठी प्रिटिंग असणार्‍या दप्तरांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, दप्तरांच्या किमतीतही यावर्षी वाढ झाली आहे. पूर्वी व्हॅट आणि एक्साईजसाठी 4.50 ते 5 टक्के कर अदा करावा लागत होता. मात्र, आता जीएसटीमुळे 14 टक्के कर भरावा लागत असल्याने दप्तरांच्या किमतीत वाढ झाल्या आहेत. त्यामुळे दप्तरांच्या किंमतीत देखील 9 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येते. या शिवाय वॉटरबॅग, डबा, कंपासपेटी अशा वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे.