Sun, May 26, 2019 15:29



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पर्यायी व्यवस्थेअभावी प्लास्टिकबंदी अशक्यच!

पर्यायी व्यवस्थेअभावी प्लास्टिकबंदी अशक्यच!

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:18AM



मुंबई : राजेश सावंत

प्लास्टिकवरील बंदी कायम ठेवत, उच्च न्यायालयाने मुंबईला प्लास्टिकमुक्त करण्याचे पाऊल उचलले आहे. मात्र सरसकट प्लास्टिक वस्तू व थर्माकोल बंद करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याकडे सरकारने फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मुंबईत प्लास्टिकबंदीची 100 टक्के अंमलबजावणी करणे शक्य नाही. प्लास्टिकसाठा असलेल्या गोदामांसह प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्यांची विक्री करणार्‍या होलसेल दुकाने, मॉल आदी ठिकाणच्या प्लास्टिक पिशव्या व अन्य वस्तूंकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे आजही फेरीवाल्यांसह छोट्या दुकानांत प्लास्टिक पिशव्या दिल्या जात आहेत. थर्माकोलच्या प्लेट, ग्लास, प्लास्टिक ग्लास, चमचे आदी वस्तूंची विक्री सुरूच आहे. 

मुंबई शहरात वार्षिक सरासरी लहान-मोठ्या प्लास्टिक पिशव्यांची 300 ते 350 कोटींची विक्री होते. त्यापैकी किमान 80 टक्के पिशव्या दररोज कचर्‍यात फेकण्यात येतात. या पिशव्या डम्पिंग ग्राऊंडसह गटार, नाले, रेल्वेमार्ग आदी ठिकाणी कित्येक वर्षे पडून असतात. पिशव्यांचे विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका पोहोचत आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदचा निर्णय योग्यच आहे.  

पालिकेने आपल्या कार्यालयात प्लास्टिक बाटल्यातून पाणी पिण्यास बंदी घातली आहे. मग रेल्वे स्टॉलसह हॉटेल, मेडिकल, ज्यूस सेंटरमध्ये मिळणार्‍या प्लास्टिकबंद बाटलीतील पाण्याचे काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुंबईत दररोज सुमारे 2 ते 3 कोटी बंद बाटल्यांच्या पाण्याची विक्री होते. यातील 40 टक्के बाटल्या या रेल्वेमार्गासह सार्वजनिक ठिकाणी नाले व गटारात फेकल्या जातात. त्यामुळे प्लास्टिकबंदीनंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी पालिकेची यंत्रणा मुंबईभर फिरत असली तरी, यातून प्लास्टिकमुक्त मुंबईचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे. 

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी 18 वर्षांपूर्वीचीच...

मुंबईत सरसकट प्लास्टिक पिशव्या बंदीची अंमलबजावणी 9 ऑगस्ट 2000 म्हणजेच सुमारे 18 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पिशव्यांचा मोह टाळा हा संदेश घेऊन, मुंबईचा एक नागरिक म्हणून पालिकेचे अधिकारी सुभाष दळवी रस्त्यावर उतरले होते. विलेपार्ले येथील एम. जी. रोडवर असलेल्या मार्केटमध्ये प्लास्टिक पिशव्या बंदची योजना राबवण्यात आली. ही संकल्पना राबवण्यापूर्वी मार्केटमध्ये येणार्‍यांचे प्रबोधन करण्यात आले होते. कपोल बँक, पालिका व स्थानिक नागरिकांनी प्लास्टिकबंदीची चळवळ राबवली होती. मार्केटमध्येच नाही तर घरोघरी कापडी पिशव्यांचे वाटप करून ही चळवळ संपूर्ण विलेपार्लेमध्ये राबवण्यात आली. विशेष म्हणजे या चळवळीत नगरसेवकांनी उडी घेतली. त्यामुळे अवघ्या सहा महिन्यांत विलेपार्ले प्लास्टिक पिशवीमुक्त झाला. एवढेच नाही तर एका दुकानदाराकडून दररोज 70 ते 100 पिशव्यांची होणारी विक्री थांबली. त्यामुळे प्रत्येक दुकानदाराची दरवर्षी 24 ते 30 हजार रुपयांची बचत होऊ लागली. हीच संकल्पना ग्रॅण्ट रोड येथील क्रांतिवीर नानासाहेब मार्केटमध्ये राबवली. येथेही लोकसहभागाने प्लास्टिक पिशव्या वापरावर निर्बंध आले. 

प्रतिबंधित प्लास्टिक संकलनासाठी संकलन केंद्र 

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. पण घरात असलेल्या प्लास्टिकचे काय, असा प्रश्न मुंबईकरांना भेडसावत आहे. त्यामुळे पालिकेने पहिल्या टप्प्यात 25 ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे उभारली आहेत. पालिकेच्या मंडयांमध्ये संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. पण याचे प्रबोधन करण्यात न आल्यामुळे मुंबईकरांना नेमके प्लास्टिक कुठे जमा करावे, हेच माहीत नाही. 

गोदामामध्ये 100 टन प्लास्टिकसाठा पडून

मुंबईतील भांडुप, कुर्ला, अंधेरी, मस्जिद बंदर, भायखळा, धारावी, जोगेश्वरी, मालवणी, गोवंडी आदी भागांत मोठ्याप्रमाणात प्लास्टिक पिशव्यांसह प्लास्टिक खेळणी व अन्य प्लास्टिकच्या वस्तूंची गोदामे आहेत. या गोदामांत अजूनही 100 टनपेक्षा जास्त माल पडून आहे. या गोदामांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्यामुळे मुंबईतील फेरीवाला, भाजीवाले, कांदा-बटाटे आदी दुकानात पातळ प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा होतो. 

भंगारच्या दुकानातील प्लास्टिकचे काय ?

मुंबईत 5 हजाराहून जास्त भंगारची दुकाने असून यातील जेमतेम 1 हजार 200 दुकानांची पालिकेकडे नोंद आहे. प्रत्येक दुकानात दररोज सुमारे 50 ते 60 किलो प्लास्टिक जमा होते. यात पिशव्यांसह प्लास्टिक बाटली व अन्य वस्तूंचा समावेश आहे. भंगाराच्या दुकानांवर अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा दुकानांमध्ये पडलेल्या प्लास्टिक वस्तूंच्या विल्हेवाटीचे काय, असा प्रश्‍नही उपस्थित केला जात आहे.

थर्माकोलच्या वस्तूंची छुपी विक्री सुरू

मुंबईतील लहान-मोठ्या कार्यक्रमांसाठी थर्माकोलच्या प्लेटसह प्लास्टिक ग्लासचा मोठ्या प्रमाणात वापर होते. सध्या थर्माकोलच्या वस्तू विकण्यासही बंदी असल्यामुळे काही दुकानदार छुपी विक्री करत आहेत. मुंबईत दररोज थर्माकोलच्या वस्तूंची सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांची उलाढाल आहे. या प्लेट बनवण्याचे महिला बचतगटाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या व्यवसायाशी सुमारे 5 ते 10 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. मुंबईत झोपडपट्टी भागात थर्माकोल बनवण्याचे छोटे कारखाने आहेत. पण यावर बंदी असल्यामुळे या महिलांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता असल्याचे माहीम येथील थर्माकोल विक्रेते अण्णा पुजारी यांनी सांगितले. 

बंदीचा मकरवाल्यांला फटका

मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात मोठ्याप्रमाणात थर्माकोलच्या मकरांची विक्री होते. दादर येथे गणेशोत्सवात 2017 मध्ये मकरविक्रीचा उच्चांक झाला होता. 
तब्बल 20 हजार लहान-मोठ्या मकरांची विक्री झाली होती. यातून सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांची उलाढाली झाल्याचे सांगण्यात येते. मात्र यंदाचा गणेशोत्सवात थर्माकोल मकरांना बंदी राहणार असल्यामुळे या धंद्यावर अवलंबून असणार्‍या शेकडो कुटुंबांना या बंदीमुळे मोठा फटका बसणार आहे.

प्लास्टिकचे दुष्परिणाम

प्लास्टिकचा वापर करून सुमारे 60 ते 65 वर्षे झाली असतील. प्लास्टिकच्या आकडेवारीसंदर्भात केलेल्या सर्वेक्षणात पृथ्वीवर 830 कोटी टन म्हणजेच जगात प्रतिमाणशी जवळपास दीड टन प्लास्टिक आहे. तब्बल 100 वर्षे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे. 2050 पर्यंत जागतिक स्तरावर प्लास्टिकची निर्मिती 1 हजार 200 कोटी टनावर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Tags : Mumbai, Incomplete arrangement, non existent, Plastic ban, Impossible,