Wed, Nov 21, 2018 01:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राचे स्टार्ट-अप धोरण

महाराष्ट्राचे स्टार्ट-अप धोरण

Published On: Jan 18 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 1:32AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात उद्योजकता वाढीस लागावी आणि नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी राज्यात स्टार्ट-अप धोरण राबविण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.  या धोरणानुसार पुढील पाच वर्षात जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमता, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा निर्मिती आदी वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 15 टक्के इतका असून तो अधिक वाढावा यासाठी राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासास चालना देण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. त्यासोबतच तरुणांना स्वत:चे उद्योग उभारता यावेत यासाठीही अनुकूल वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली या विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या सह-अध्यक्षतेतील महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या माध्यमातून हे धोरण तयार करण्यात आले आहे.