Tue, Jun 25, 2019 13:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंब्रा बायपास मार्गावरून वाहतूक सुरु

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंब्रा बायपास मार्गावरून वाहतूक सुरु

Published On: Sep 10 2018 5:04PM | Last Updated: Sep 10 2018 5:04PMठाणे : प्रतिनिधी 

मुंब्रा बायपासवरून आज सकाळपासून वाहतूक सुरु झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी फीत कापून आणि नारळ वाढवून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आल्याचे जाहीर केले. याप्रसंगी वाहतूक पोलिस उपायुक्त अमित काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पनवेल एस पी श्रावगे, सेक्शन इंजिनिअर आशा जटाळ, आदींची उपस्थिती होती.

९ मे २०१८ रोजी या मार्गावरील वाहतूक बाह्य वळण रस्त्यावरील रेल्वे ओव्हर ब्रिजच्या दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली होती. पुलाच्या डागडुजीशिवाय प्रत्यक्षात वेगवेगळ्या ठिकाणी देखील या मार्गावर दुरुस्तींचे काम करावे लागले. पुलाचे बेअरिंग्ज बदलणे, काँक्रीटीकरण अशी कामे हाती घेण्यात आली होती. पुलाच्या तळाकडून अद्यापही काही कामे सुरु आहेत. एकंदर ६ किमी अंतर असलेला हा बाह्य वळण मार्ग जुलैमध्ये पडलेल्या जोरदार पावसानंतर काही ठिकाणी खचला देखील होता, त्याची दुरुस्ती करण्याचे अतिरिक्त कामही सार्वजनिक बांधकाम विभागाला करावे लागले. पारसिक बोगद्यावरून जाणाऱ्या रस्त्याचीही दुरुस्ती करावी लागली तसेच ज्या ठिकाणी मुंब्रा आणि शिळफाट्याकडे जाणारे वाय जंक्शन आहे तिथेही काँक्रीटीकरण करावे लागले, याशिवाय काही ठिकाणी संरक्षक भिंतही बांधावी लागली.

या दुरुस्ती कामामुळे सुमारे ४ महिने वाहतूक ऐरोली, शिळफाटा मार्गे वळवण्यात होती. ठाणे तसेच नवी मुंबईदरम्यानच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. मात्र हा मार्ग आता दुरुस्त आणि अधिक सुरक्षित झाल्याने प्रवास सुखकर होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त करून वाहनधारक पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागास धन्यवाद देत होते.