Mon, Apr 22, 2019 15:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘हापूस’ कोकणातील की कर्नाटकचा ?

‘हापूस’ कोकणातील की कर्नाटकचा ?

Published On: Apr 09 2018 1:50AM | Last Updated: Apr 09 2018 1:24AMमुंबई : संजय गडदे

सध्या आंब्याचा सिझन असल्याने मुंबई बाजारात या फळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. आंबा हा सर्वांनाच आवडतो. त्यात कोकणचा हापूस म्हटले की खाणार्‍यांच्या तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा. मात्र सध्या मुंबईच्या विविध भागात हातगाडीवर किंवा सिग्नलवर विकला जाणारा आंबा कोकण देवगडचा हापूस म्हणून विकला जात आहे. मात्र विक्रेत्यांकडून आंबा खरेदी करणार्‍यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. कोकणातील हापूस आंब्याच्या नावाने अनेक फळविक्रेत्यांकडून कर्नाटकातील हापूस आंब्याची विक्री केली जात आहे. त्यामुळे हापूस कोकणचा की कर्नाटकचा, असा प्रश्‍न आता पुढे आला आहे.

नवी मुंबईच्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फ्रुट बाजारात सध्या हापूस आंब्याच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. रोज 60 ते 65 हजार पेट्या दाखल होत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात कोकणातील हापूस आंब्याला कर्नाटकमधील हापूसने टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक खवय्यांना मात्र आपण खात असलेला आंबा देवगड कोकणचा हापूस आहे की कर्नाटकचा हापूस हे मात्र समजत नसल्याने त्यांची फसवणूक होत आहे. मात्र आंबा खाऊन झाल्यावर त्यांच्या लक्षात येते की आपली फसगत झाली आहे.

सध्या एपीएमसीमध्ये 10 ते 15 हजार पेट्या या कर्नाटक हापूस आंब्याच्या येत आहेत. कर्नाटक हापूस हा रस्त्यावर विकताना विक्रेत्यांकडून कोकणातील हापूस असल्याचा भासवला जातो. वरवर पाहता कोकण हापूस आणि कर्नाटक हापूस आंब्यातील फरक पाहणार्‍यांच्या पटकन ध्यानात येत नसल्याने फसवणूक होत आहे. हातगाडीवर, रस्त्यावर विकताना कोकणातील हापूसच्या जागी कर्नाटकमधील हापूस ग्राहकांच्या गळ्यात मारला जात आहे. कोकणातील हापूस डझनावर तर कर्नाटकमधील हापूस किलोवर विकला जात आहे. जादा पैसे कमवण्यासाठी हातगाडी किरकोळ व्यापार्‍यांकडून फसवेगिरी केली जात आहे.