Tue, Jun 18, 2019 20:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ठाकरे’ चित्रपटात नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत(व्हिडिओ)

‘ठाकरे’ चित्रपटात नवाझुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत (व्हिडिओ)

Published On: Dec 22 2017 1:32AM | Last Updated: Dec 22 2017 1:32AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्‍तिमत्त्वाशी साधर्म्य साधणारा चेहरा, तशीच लकब आणि खास ठाकरे शैलीतील भेदक नजर यातून अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी या कलाकाराने साकारलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील चित्रपटाच्या टीझरने गुरुवारी रसिकांची मने जिंकली. व्यंगचित्रापासून ते राजकारणाच्या क्षेत्रात महानायक ठरलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील चित्रपटाचा हा टीझर महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच होणे, हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख अदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. बाळासाहेबांवरील हा चित्रपट हिंदी आणि मराठी भाषांत बनणार आहे. ‘ठाकरे’ असे या बायोपिकचे नाव असणार आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनसेचे नेते अभिजित पानसे यांच्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसेची अनोखी युती जुळून आली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मार्च 2018 मध्ये या सिनेमाचं चित्रीकरण सुरू होणार असून, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारी 2019 ला हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.