Wed, Jul 17, 2019 20:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राणीबागेमधील फ्लिपर पेंग्विन होणार आई!

राणीबागेमधील फ्लिपर पेंग्विन होणार आई!

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:52AMमुंबई : तन्मय शिंदे

मुंबईसह संपूर्ण देशातील नागरिकांना आकर्षित करणार्‍या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्रणिसंग्रहालयामधील (राणीबाग) हॅम्बोल्ट पेंग्विनच्या मादीने गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अंडे दिले. सीसीटीव्हीद्वारे ही माहिती राणीबाग प्रशासनाला समजली आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच आनंद व्यक्त होऊ लागला. फ्लिपर आई होणार असल्याने तिच्या खाण्यापिण्याकडे राणीबाग प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे.

राणिबागेतील मोल्ट या 3 वर्षीय नरापासून फ्लिपर या 5 वर्षीय मादीने अंडे दिले आहे. या अंड्यातून पिल्लू बाहेर येण्यासाठी किमान 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे. फ्लिपरच्या खाण्यापिण्याकडे राणीबाग प्रशासनाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे आधीच लाडोबा असलेल्या या सर्व पेंग्विनमध्ये फ्लिपरचे जास्त लाड होणार हे नक्की. मादी आपले अंडे उबविण्यासाठी जागा ठरवते. त्याचप्रमाणे या मादीनेही आपली जागा निश्‍चित करुन ती हे अंडे उबविण्यासाठी बसली आहे. त्यामुळे कोणत्याही वेगळ्या जागेची सोय करावी लागत नसल्याचे राणीबागेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

हॅम्बोल्ट पेंग्विनची मादी दिलेल्या अंड्याकडे कधीतरी दुर्लक्ष करते. यासाठी राणीबाग प्रशासनाने आर्टिफिशियल इन्क्युबेटरची सोय करण्यात आली आहे.जर काही कारणास्तव या मादीने अंड्याकडे दुर्लक्ष केले तर हा पर्याय राणीबाग प्रशासनाने ठेवलेला आहे. तसेच अंड्यातून पिल्लू बाहेर येण्याचा सक्सेस रेट जास्त असला तरी पहिल्यांदाच राणीबागेत ही घटना घडत असल्यामुळे जास्त काळजी घेतली जात आहे.

हॅम्बोल्ट पेंग्वीनच्या माद्या साधारणपणे दोन वेळान मेटींग करतात. त्याचा कालावधी हा मे-जून तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर असतो. प्रत्येक हॅम्बोल्ट मादी ही साधारणपणे दोन अंडी देते. अंडे देण्याच्या दिवसातील फरक हा दोन ते तीन दिवस असू शकतो. त्यामुळे फ्लिपरही दोन अंडी देणार का हा सध्या राणीबागेत चर्चेचा विषय आहे.

26 जुलै 2016 साली 8 पेंग्विन हे साऊथ कोरीयामधून आणण्यात आले होते. यामध्ये तीन नर व पाच मादी पेंग्विन होत्या. त्यातील एक डोरी मादीचा मृत्यू झाला. 2016 साली पेंग्विन आणण्यात आले त्यावेळी मोल्ट एक ते दिड वर्षाचा होता व फ्लिपर अडीच ते तीन वर्षाची होती.