Mon, Aug 19, 2019 05:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील साडेसात लाख घरे महारेराच्या कक्षेत?

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील साडेसात लाख घरे महारेराच्या कक्षेत?

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:34AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

बिल्डरांनी भोगवटा प्रमाणपत्र न देता रहिवाशांना सदनिका हस्तांतरित केलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरांमधील सुमारे 7 लाख 50 हजार फ्लॅट महारेराच्या थेट कक्षेत आणण्यात येणार आहे. महारेरामधील तरतुदींचा सोयीने अर्थ लावून फ्लॅटधारकांची दिशाभूल करणार्‍या बिल्डरांवर त्यामुळे कारवाई होणे शक्य होईल.

महाराष्ट्र मालमत्ता नियामक प्राधिकरण (महारेरा) लागू होण्याची चिन्हे दिसताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासह इतर प्रमुख शहरांमधील बिल्डरांनी ना हरकत ( एनओसी) न देताच मालकांना सदनिका दिल्या. महारेरा लागू होण्याच्या आधीच इमारती बांधल्या असल्यामुळे आपल्याला हा कायदा लागू होत नाही, असे सांगून काही बिल्डर सदनिका ताब्यात देऊन नामानिराळे झाले. आता या इमारतींच्या गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्या आहेत. तरीही बिल्डर ओसी देत नसल्यामुळे सदनिकाधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय महारेराची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने सदनिकाधारकांची फसवणूक सुरुच असल्याची माहिती मिळाल्यामुळे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग यांनी सोमवारी दिल्लीत केंद्रीय सल्लागार समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत महामुंबई प्रदेशातील सुमारे  7 लाख 50 हजार फ्लॅट महारेराच्या थेट कक्षेत आणण्यात येतील, अशी शक्यता महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी व्यक्त केली.

शहरांच्या सीमेलगत (झालर क्षेत्र) म्हणजे ग्रामपंचातींच्या हद्दीमध्येही अनेक इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत. तेथेही बिल्डरांनी महारेराचे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. अशा सर्व ठिकाणच्या सदनिका महारेराच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. सोमवारी होणार्‍या बैठकीत केंद्रीय व राज्याच्या रेरा कायद्यातील सुधारणा, एकखिडकी योजनांवरही चर्चा होणार असल्याचे प्रभू म्हणाले.