Thu, Jul 18, 2019 04:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महड विषबाधा प्रकरण; सूडातून झाले महानाट्य

महड विषबाधा प्रकरण; सूडातून झाले महानाट्य

Published On: Jun 23 2018 7:48AM | Last Updated: Jun 23 2018 7:48AMखालापूर/ खोपोली ; प्रतिनिधी

महड येथील वास्तूशांतीच्या कार्यक्रमात 86 लोकांना मळमळ होणे व पाच जणांचा मृत्यू या घटनेला सुडाने पेटलेली प्रज्ञा सुरवशे ही तीस वर्षीय महिला कारणीभूत ठरली आहे. प्रज्ञाचे रंगाने काळी असल्यामुळे तिचे एक लग्न मोडले होते. मात्र दुसरेही लग्न मोडणार या भीतीने माने, शिंदे व सुरवशे कुटूंबियांना संपविण्याचा डाव प्रज्ञाने रचला आणि जेवणात फोरेट नावाचे विषारी औषध मिसळून अनेकांना यमसदनी पाठवले. ही मास्टरमाईंड महिला आता पोलीस कस्टडीची  आहे.

खालापूर तालुक्यातील महड येथे वास्तुशांती कार्यक्रमाच्या अन्नातून विषबाधा प्रकरणी पोलिसांनी प्रज्ञा(उर्फ ज्योती) सुरेश सुरवशे (30) या महिलेला अटक केली. कौटूंबिक वादातून माने, शिंदे व सुरवशे यांचे संपूर्ण कूटूंब संपविण्याच्या द्वेषापोटी हे कृत्य केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे. सोमवारी 18 जून रोजी महड येथे सुभाष माने यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 86 जणांना उलट्याचा त्रास सुरू झाला होता. दुर्दैवाने ऊपचारापूर्वीच कल्याणी प्रकाश शिंगुडे (7) ऋषिकेश  शिंदे (12) व  प्रगती शिंदे (13) तीन मुलांचा मृत्यू झाला होता, तर गुरूवारी उपचार सुरू असताना विजय शिंदे (11) व गोपीनाथ नकुरे (54) या दोघांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी पहिल्या दिवसापासून या घटनेला गांभिर्याने घेत तपास सुरू केला होता. रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग रायगडचे जमील शेख, खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्‍वजीत कांईंगडे, महिला पोलीस निरिक्षक अंबिका अंधारे, शेलार यांनी तपास मोहीम राबवित सुरवातीला तीन संशयिताना ताब्यात घेतले होते. तब्बल चार दिवसाच्या  चौकशीत दरम्यान सुभाष माने यांची नातेवाईक प्रज्ञा हिनेच डाळीत विष टाकल्याची कबुली दिली आहे.  सुभाष माने, सुरवशे तसेच मयत मुलातील शिंदे कुटूंब एकमेकाचे नातेवाईक आहेत. प्रज्ञाची सासू सिंधू सुरवशे तसेच सुभाष माने यांची पत्नी सरिता प्रज्ञाला नेहमी तू काळी आहेस. जेवण बनवता येत नाही म्हणून टोमणे मारून अपमानित करीत होते. तसेच तिच्या नणंद असलेल्या मयत (मुलांच्या आई) उज्वला व अल्का या देखील त्रास देत असल्यामुळे हे कुटूंब संपविण्यासाठी डाळीत विष टाकल्याची कबुली प्रज्ञा हिने दिली आहे. 

पोलिसांनी प्रज्ञावर मनुष्यवध तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरिक्षक भासे, ठाकूर, सहा.फौजदार पवार, पोलीस नाईक प्रशांत म्हात्रे, गबाळे, शेङगे, कोकाटे, कोकरे, महिला पोलीस नाईक खैर, पोलीस शिपाई समीर पवार, तांदळे यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यानी पत्रकार परिषदेत सांगितले. 

सूडातून झाले महानाट्य

ज्यांच्यावर राग होता ते सुभाष माने, सासू सिंधू सुरवशे, नणंद उज्वला कदम व अल्का शिंदे या लवकर जेवल्यामुळे प्रज्ञाला त्यांना मारण्याची संधी मिळाली नाही. परंतु शिंदे कुटूंबातील मुलं जेवायला आल्यावर तिने वरणाच्या बादलीत फोरेट हे विषारी द्रव्य टाकले आणि पुढील विषबाधा कांड घडले.

संसार मोडण्याची भीती

प्रज्ञाचे पहिले लग्न झाले होते. ते शिंदे कुटूंबामुळे मोडेले व सोडचिठ्ठी घ्यावी लागली होती. त्यामुळे पुन्हा आपला संसार मोडेले या भीतीपोटी तिने सासू सिंधु, सुभाष माने व त्याची पत्नी सरिता तसेच नणंद शिंदे व कदम कुटूंब संपविण्याचा अघोरी निर्णय घेतला व त्यातून विषबाधा प्रकरण घडले.